पिंपरी, दि. 14 (प्रतिनिधी) -अपघातात जखमी झालेला मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी आमदार रोहित पवार शहरात आले होते. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते तानाजी भोसले यांचा दसऱ्याच्या आदल्या दिवशी भीषण अपघात झाला. त्यामुळे गंभीर जखमी असलेले तानाजी यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आमदार पवार यांनी तानाजी यांची भेट घेतली. तसेच, संबंधित डॉक्टरांशी चर्चा करुन उपचाराबाबत माहिती जाणून घेतली. त्यांना योग्य ते उपचार करण्यास सांगितले. तानाजी यांच्या आई-वडिलांना भेटत त्यांनाही पवार यांनी धीर दिला. उपचारात कोणतीही अडचण आल्यास मदतीचे आश्वासनही दिले.
यावेळी युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्रान शेख, प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, युवकचे प्रसाद कोलते, राहुल पवार,आयुष निंबारकर, बापू कातळे, प्रवीण खरात, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे आदी उपस्थित होते.
लांडगे कुटुंबीयांचे सांत्वन
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई लांडगे यांचे नुकतेच निधन झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुरूवार (दि.13) रोजी भेट घेऊन लांडगे कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी आमदार रोहित पवार यांनी लांडगे कुटुंबीयांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.