चिंचवड – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड, देहूगाव व निगडी शाखा यांच्या वतीने ‘चला व्यसनाला बदनाम करूया’ या उपक्रमाचे आयोजन केले होते.
निगडी येथील भक्तीशक्ती उद्यानासमोर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नागरिकांना मोफत दुधाचे वाटप करून प्रबोधनाची गाणी सादर केली गेली. त्याचप्रमाणे व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन केले गेले. महिलांनी दारूच्या प्रतिकात्मक बाटलीला जोडे मारून आपला निषेध व्यक्त केला. अनेक नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते. अत्यंत स्त्युत्य असा हा उपक्रम असून सर्व स्तरांपर्यंत असे उपक्रम राबविण्याची गरज आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईत प्रचंड उत्साह असतो. मात्र, काही तरुण दारू प्राशन करून धिंगाणा घालतात. यामुळे वादविवाद होऊन वातावरण कलुषित होते. तसेच दारू प्राशन करून वाहन चालविल्याने अपघात घडतात, अशा घटना घडू नये यासाठी दारू नव्हे तर शरीराला लाभादायी दूध पिऊन नववर्षाचे स्वागत करा. कोणत्याही अमली पदार्थांचे व्यसन वाईटच असते. अलीकडे तरुण पिढी दारूच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करीत असल्याचे मत या ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष सोळंकी यांनी व्यक्त केले.
या उपक्रमासाठी राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीराम नलावडे, पिंपरी चिंचवड शाखेचे विजय सुर्वे, अंजली इंगळे, सुधीर मुरुडकर, सुरेश व सीमा बावनकर, राजू जाधव, रविंद्र व राधिका बोर्लिकर, अशोक जाधव, स्नेहा देशमुख यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. निगडी शाखेचे अध्यक्ष प्रदीप तासगावकर व अभिजित नलावडे यांनी दुधासाठी सहकार्य केले. तीनशेच्या वर सर्व वयोगटातील नागरिकांनी दुधाचा आस्वाद घेतला. या वेळेस परिसरातील स्वच्छता करण्यात आली. तसेच वाचकांना वार्षिक अंक देऊन पुढील वर्षाची वार्तापत्र सभासद नोंदणी करण्यात आली. सर्व नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.