पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रुग्णांची परवड होत आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार केले जात नाहीत. उपचारासाठी आलेल्या रुग्णाला इतर रुग्णालयाचा दरवाजा दाखविला जातो. त्यामुळे असा मनमानी कारभार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आळा घालून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जनअधिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मजीद शेख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
शेख यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, ओपीडी पासून कॅज्युअलिटी पर्यंत आणि आयपीडी रुग्णांपर्यंत तसेच आंतररुग्न, बाह्य रुग्ण आणि नातेवाईकांची अडवणूक करून लुबाडणूकीचे प्रकार चालू आहेत. डॉक्टर आणि कर्मचारी नातेवाईकांना जीवाची भीती दाखवून दुसऱ्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होण्यासाठी भाग पाडत आहेत. रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना व्यवस्थित उत्तरे दिली जात नाहीत. रुग्णालयातील प्रमुख अधिकाऱ्यांचा आदेश कर्मचारी मानत नाहीत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.