पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी बनण्यासाठी विविध योजना राबवित आहे. तसेच केंद्र व राज्य शासन देखील विविध प्रकल्प राबवित आहे. परंतु शहरातील महत्त्वाचे चौक व महापालिकेच्या मोकळ्या जागा आज ओपन बार म्हणून समोर येत आहेत. शहरातील मद्यपी बिअर बार, वॉइन शॉपमधून मद्य घेऊन स्पाइन रोडच्या मधल्या परिसरात सकाळी अकरा ते रात्री दहापर्यंत मद्यपी दारूपित बसलेले असतात. त्यामुळे हा स्पाइन रोड आहे की महापालिका प्रशासनाने अधिकृत ओपन बार सुरू केला आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
दीपावलीच्या सणानिमित्त लागोपाठ सुट्ट्या आल्या आहेत. बरेच पाहुणे नातेवाइकांकडे आले आहेत. त्यातील जे मद्यपान करतात ते वॉइन शॉप, बिअर बारमधून दारू घेऊन कोणीही त्रास देणार नाही अशा ठिकाणी म्हणजे महापालिकेच्या मोकळ्या जागेत, पीएमआरडीएच्या मोकळ्या प्लॉटमध्ये तसेच मोठ्या रस्त्यांच्या कडेला शहरात सर्रास दारुपिताना दिसून येत आहेत. या सर्व गोष्टींकडे पोलीस व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सध्या ओपन बारची संकल्पना शहरात वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे उपनगरांतील संस्कृतीला गालबोट लागताना दिसून येत आहे.
स्पाइन रोड हा शहरातील महत्त्वाचा रहदारीचा मार्ग आहे. या मार्गावरील कृष्णा चौकात स्पाइन रोडच्या मधल्या जागेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने हॉकर्स झोनची निर्मिती करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून सिमेंटचे ओटे बांधण्यात आले. तसेच लाइटची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या लाइट लावण्यात येत नाहीत. कृष्णा चौकात एक वाइन शॉप आहे. या वॉइन शॉपमधून दारू खरेदी करून बहुतांश नागरिक सकाळी अकरा ते रात्री दहा अकरापर्यंत अविरतपणे टोळके करून एकटे तर गटागटाने दारू पित बसलेले असतात. तसेच शरदनगरकडे जाणान्या मार्गावर हनुमान मंदिराच्या जवळ देखील सर्व्हिस रस्त्यावर बरेच मद्यपी दुकानातून दारू आणून भर रस्त्यात पित बसलेले असतात. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.
कचरावेचकांमुळे परिसर स्वच्छ
या परिसरात मद्यपी जे कचरा करत आहेत. बॉटल टाकून देत आहेत. त्या काचेच्या बॉटल, प्लस्टिक बॉटल, ग्लास तसेच इतर साहित्य स्पाइन रोडच्या मधल्या मोकळ्या जागेत पडलेले असतात. परंतु परिसरातील कचरावेचकांकडून येथील प्लॅस्टिक बॉटल, दारूच्या बॉटल गोळा करून विक्री केली जात असल्याने परिसरातील कचरा दररोज साफ होत असल्याने महापालिकेला येथे स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज पडत नाही. परंतु लाखो रुपये खर्च करून तयार केलेला हॉकर्स झोन आता ओपन बार म्हणून नावारुपास येत आहे. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने शहराच्या संस्कृतीला गालबोट लागत आहे.
पोलीस प्रशासनाचा कानाडोळा
साने चौक, कृष्णा चौक, थरमॅक्स चौक, कस्तुरी मार्केट आदी परिसरातून दारू खरेदी करून स्पाइन रोड परिसरात दररोज दारू पित बसलेले असतात. परंतु चिखली पोलीस स्टेशन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न आहे. चौकापासून काही मीटर अंतरावर साने पोलीस चौकी आहे. तसेच जवळच पोलीस लाइन क्वॉर्टर आहे. तसेच वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस देखील या चौकात असतात. परंतु प्रशासन कानाडोळा करत असल्याने शेजारीच मद्यपी भर रस्त्यातील मोकळ्या जागेत आणि सध्याच्या नियोजित हॉकर्स झोनमध्ये दारू पित बसलेले असतात परंतु पोलीस एका शब्दाने काही बोलत नसल्याने येथील मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
कृष्णानगर येथील भाजी मंडई चौकातील मद्यपींवर चिखली पोलिसांकडून वारंवार कारवाई करण्यात येत आहे. परंतु महापालिकेने ही जागा मोकळी ठेवल्याने मद्यपी येथे येऊन बसत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस गेले असता ते रस्त्यावर पळत सुटतात व वाहनांना अपघात घडत आहेत. त्यामुळे महापालिकेने येथील जागा बंदिस्त करून येथे त्वरित हॉकर्स झोन सुरू करावा म्हणजे येथे मद्यपी बसणार नाहीत.
– ज्ञानेश्वर काटकर, चिखली पोलीस स्टेशन
महापालिकेने पथारीवाले, फिरवाले यांच्याशी बैठक घेऊन त्यांना जागा दाखवली आहे. लवकरच येथे हॉकर्स झोन सुरू करत आहोत. येथे हॉकर्स झोन सुरू झाल्यानंतर मद्यपींची समस्या सुटणार आहे.
– सीताराम बहुरे, फ क्षेत्रीय अधिकारी.