पिंपरी – भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी शंकर जगताप यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत केलेल्या कामगिरीची पक्ष पातळीवर दखल घेऊन ही निवड केली जात असल्याची चर्चा आहे.
भाजपाची राज्य कार्यकारिणी 5 मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष 15 मे आणि नंतर 20 मे पर्यंत जाहीर होतील, असे सांगण्यात आले होते. त्यानंतरही नियुक्त्या झाल्या नव्हत्या. मोदी@9 या मोहिमेमुळे या नेमणुकांना ब्रेक लागला होता. अखेरीस बुधवारी (दि. 19) नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
शंकर जगताप हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक होते. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता असताना ऐनवेळी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली.
आमदार अश्विनी जगताप यांच्या विजयात शंकर जगताप यांनी देखील महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे पक्षाने त्याची दखल घेत शंकर जगताप यांच्यावर शहराची जबाबदारी दिली आहे. महापालिका निवडणूक, लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वपूर्ण मानली जात आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत महापालिकेत सत्ता कायम ठेवणे हे त्यांच्यापुढील प्रमुख आव्हान असणार आहे.