संगमनेर- दुचाकीवरून घरी सोडण्याचा बहाणा करून नराधमाने अवघ्या साडेबारा वर्षाच्या चिमुरडीला मंदिराच्या परिसरातील झाडाझुडपांमध्ये नेवून दिवसभर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर चार दिवसांनी पीडित मुलीच्या वडिलांनी तालुका पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पंकज शरद दुबे या नराधमाविरोधात अपहरण व बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या कायद्यातील (पोक्सो) कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदरचा प्रकार गेल्या शुक्रवारी पेमगिरी ते शिरसगाव धुपे मार्गावरील बाळेश्वराच्या टेकडीवरील जंगलात घडला. त्यानुसार पेमगिरी येथे राहणारा नराधम पंकज शरद दुबे याने एका साडेबारा वर्षाच्या मुलीस आपल्या दुचाकीवरून घरी नेवून सोडण्याचा बहाणा केला. मात्र, त्याच्या मनात आधीपासूनच वासना दाटून आलेली असल्याने त्याने तिला मंदिराच्या टेकडीवरील झाडाझुडपात नेले. या घटनेने घाबरलेली मुलगी घरी गेल्यानंतर कोणाशीही बोलली नाही. मात्र, झाल्या प्रकाराने तिला प्रचंड त्रास होऊ लागल्याने अखेर तिने घटनेच्या चौथ्या दिवशी घडला प्रकार आपल्या पालकांना सांगितला.
पीडितेसह तिच्या वडिलांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात येवून प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक शिरीष वमणे यांना घडला प्रकार सांगितला. त्यावरुन त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तालुका पोलिसांनी आरोपी पंकज शरद दुबे (रा. पेमगिरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक वमणे करत आहे.