पिंपरी – मानवी जीवनात ज्ञान, मोक्ष, त्याग, उपवास, तप आणि जप याचे महत्त्व अधोरेखित करणारी तसेच शिव-शक्ती आणि शिव- महिमा याची प्रचिती देणारे शिव चरित्र पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील भाविक-भक्तांना श्रवण करता यावे. यासाठी श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा भक्ती सोहळ्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार, निर्माल्य फाउंडेशन यांच्या वतीने श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथेचे आयोजन 15 ते 21 सप्टेंबर 2023 दरम्यान दुपारी 2 ते 5 या वेळेत पीडब्ल्यूडी मैदान, नवी सांगवी येथे केले आहे. परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून हा अभूतपूर्व अध्यात्मिक सोहळा रंगणार आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिव पुराण कथा वाचन सोहळा आहे.
शंकर जगताप म्हणाले की, मध्यप्रदेश येथील प. पू. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमोघ वाणीतून ही कथा ऐकण्याची संधी पिंपरी-चिंचवडवासीयांना मिळणार आहे. पंडित मिश्रा यांचे हजारो अनुयायी कथेचे श्रवण करण्यासाठी येणार आहेत. या दिवसांमध्ये सुमारे आठ ते नऊ लाख श्रोते या कथेचे श्रवण करतील. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिवभक्त या कथा वाचन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी श्री शिव महापुराण कथा आयोजन समिती गठीत केली आहे.
कोण आहेत पंडित प्रदीप मिश्रा?
प. पू. पंडित प्रदीप मिश्रा हे मध्यप्रदेश सिहोर येथील आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा वाचक म्हणून आध्यात्मिक क्षेत्रात ओळख आहे. भगवान महादेवाची शिव महापुराण कथा लोकांपर्यंत पोहोचवावी आणि त्यातून लोकांना चांगल्या मार्गावर जगण्याची प्रेरणा मिळावी, या उद्दात्त हेतूने कार्य करीत आहेत. त्यांचे लाखो अनुयायी आहेत. शिव पुराण कथेसोबतच मानवी जीवनात येणाऱ्या समस्यांवर मार्गही ते सांगतात. विशेष म्हणजे, सनातन धर्माबाबत प्रचंड अभिमान असलेले आध्यात्मिक गुरू म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.