पिंपरी – महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाच्या वतीने इंडियन स्वच्छता लीग 2.0 निमित्त जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रभात फेरीमध्ये सुमारे 5000 विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेतला. त्यांच्या माध्यमातून शहरात स्वच्छता विषयक जनजागृती केली.
इंडियन स्वच्छता लीग 2.0 निमित्त 15 स्पटेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान केंद्र शासनाच्या वतीने विशेष मोहीम व जनजागृती उपक्रम राबविण्याच्या सूचना दिलेल्या असून त्या अंर्तगत क क्षेत्रीय कार्यालयामध्ये (1) प्रभाग क्र. 2 जाधववाडी मधील सहजीवन माध्यमिक विद्यालय (2) प्रभाग क्र. 6 भोसरी मधील भैरवनाथ माध्यमिक विद्यालय (3) प्रभाग क्र. 8 इंद्रायणीनगर मधील वैष्णवमाता प्राथमिक व माध्यमिक विद्यालय (4) प्रभाग क्र. 9 नेहरुनगर मधील राजीव गांधी माध्यमिक विद्यालय या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिक व मनपा अधिकारी, कर्मचारी यांनी स्वच्छता फेरीमध्ये सहभाग घेऊन जनजागृती केली.
या उपक्रमात सहा आयुक्त तथा क्षेत्रिय अधिकारी अण्णा बोदडे, माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे, सहाय्यक आरोग्याधिकारी तानाजी दाते, मुख्य आरोग्य निरिक्षक राजेंद्र उजिनवाल, आरोग्य निरिक्षक वैभव घोळवे, क्षितीज रोकडे, मनपा अधिकारी कर्मचारी, यांच्यासह सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक सहभागी झाले होते.
स्वच्छता म्हणजे रोजचा सण, नाहीतर कायमचे आजारपण, स्वच्छ भारत.. सुंदर भारत, कापडी पिशवी घरोघरी.. पर्यावरणाचे रक्षण करी, अशा विविध घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता विषयक जनजागृती केली. इंद्रायणीनगर, धावडेवस्ती, जाधववाडी चिखली, नेहरुनगर इत्यादी परिसरात प्रभात फेरीद्वारे व पथनाट्यद्वारे स्वच्छता विषयक जनजागृतीचे फलक हाती घेण्यात आले होते. हजारो विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेतली.