पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – पिंपरी न्यायालयाच्या कामकाजासाठी मोरवाडीतील इमारतीत जागेची कमतरता भासत असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने नेहरूनगर येथे न्यायालयासाठी नवीन इमारत बांधली. मात्र, इमारतीची स्थापत्य विषयक कामे पूर्ण करण्यास विलंब होत असल्यामुळे नवीन इमारतीमध्ये न्यायालयाचे स्थलांतर होण्याचा मुहूर्त लांबणीवर पडत आहे. यावरून पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे इमारतीची अंतर्गत कामे वेळेत मार्गी लागत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात सध्या 5 प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांची न्यायालये कार्यान्वित आहेत. न्यायालयासाठी सध्या उपलब्ध असलेली इमारतीची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन इमारतीची मागणी ब-याच दिवसांपासून केली जात होती. त्यावर, पिंपरी-चिंचवड महापालिकेने नेहरुनगर येथील स्व. अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील प्रशासकीय मालकीची इमारत देण्याची तयारी दाखविली. त्यानुसार आवश्यक दुरुस्ती व अंतर्गत सुधारणा करून ही इमारत न्यायालयाच्या कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरुपात देण्याचे ठरले. त्यासाठी पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे पदाधिकारी व पुणे जिल्हा न्यायाधीश यांच्याकडून इमारतीची पाहणी करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शक सूचनांचा अंतर्भाव करून प्रस्तावित न्यायालयाच्या इमारतीत अंतर्गत फर्निचरची व स्थापत्य विषयक कामे कामे केली जात आहेत.
महापालिकेने या इमारतीत अंतर्गत फर्निचरची कामे करण्यासाठी सुरुवातीला पाच कोटींची निविदा काढली. गेल्या दोन वर्षांपासून ही कामे सुरू आहेत. मात्र, या कामासाठी पाच कोटींचा निधी कमी पडला. त्यामुळे उर्वरीत स्थापत्य आणि विद्युतविषयक कामे मार्गी लावण्यासाठी पुन्हा नव्याने 3 कोटी 59 लाख रुपयांची निविदा काढण्यात आली. आता हे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे मोरवाडीतील न्यायालयाला या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर होण्यास विलंब होत आहे. दिवाळीनंतर न्यायालयाचे स्थलांतर करण्यात येईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.
मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी 15 ऑगस्ट पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 15 ऑगस्ट पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु महापालिकेने अपेक्षित वेगाने काम पूर्ण केले नाही. इमारतीमधील अंतर्गत फर्निचरची कामे पूर्ण झालीत. सर्व्हर, फायर फायटिंग, विद्युत विषयक कामे राहिली आहेत. निधी कमी पडल्याने साडेतीन कोटीची नव्याने निविदा काढण्यात आली. त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी गेल्याने या कामासाठी विलंब झाला. यातील महत्वाची कामे प्राथमिक स्तरावर पूर्ण झाल्यानंतर शिफ्टींगचे काम सुरू होईल.
– ऍड. सचिन थोपटे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशन
या न्यायालयांची कामे चालणार
नेहरुनगर येथील स्व. अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील नवीन इमारतीत न्यायालय स्थलांतर झाल्यानंतर विविध गुन्ह्यांचे कामकाज चालणार आहे. त्यामध्ये 5 प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, 2 वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय, 1 बालन्यायालय, 1 मोटार वाहन न्यायालय आदींचा समावेश आहे. शिवाय, आणखी दोन न्यायालयांची मागणी पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनतर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सचिन थोपटे यांनी दिली.