आयुक्तालयातील प्रकार : प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईचा कर्मचाऱ्यांना फटका
पिंपरी : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून पगार रखडले आहेत. कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या दफ्तर दिरंगाईमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने त्यांना अर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
उभारणीपासून सुरु असलेल्या अडचणींच्या फेऱ्यातून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अद्याप बाहेर आलेले नाही. प्रशासकीय अडचणींसोबत आता कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या देखील अडचणी समोर येत आहेत. आयुक्तालयाच्या उभारणीनंतर सुरुवातीला कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर आयुक्तालयाला वाहनांच्या समस्येने ग्रासले. होते. आता आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्यांनाच पगाराच्या संकटाने ग्रासले आहे.
आयुक्तालयातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांमुळे पोलिसांचे पगार वेळेवर होत नसल्याची माहीती समोर आली असून मागील तीन महिन्यापासून काही कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या नॉर्थ झोनकडून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगाराची कागदपत्र (एलपीसी) होण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे वेतन वेळेत करण्यास विलंब लागत असल्याचे कारण प्रशासन अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे.