पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरासह पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या मावळ तालुक्यातही गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. चिखलीतही एका तरुणाचा भरदिवसा वर्चस्ववादातून खून करण्यात आला. भरदिवसा गोळीबार करून खून केले जात आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराची वाटचाल क्राइम कॅपिटलकडे होत असल्याची टीका होऊ लागली आहे. हा “क्राइम कॅपिटल’ हा ठसा पुसण्यासाठी पोलीस विभागाकडून चांगलीच खबरदारी घेतली जात आहे. अलीकडे कारागृहातून सुटलेल्या अट्टल गुन्हेगारांची रोजच्या रोज झाडाझडती घेतली जाणार आहे. बीट मार्शल गुन्हेगारांच्या घरी जाऊन त्यांच्या कारवायांवर नजर ठेवली जाणार आहे.
1 एप्रिल रोजी शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची कोयत्याने वार करीत हत्या झाली. त्यानंतर 12 मे रोजी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आवारात गोळ्या घालून तसेच कोयत्याने वार करीत हत्या करण्यात आली. तर वर्चस्व वादातून चिखली येथे सोन्या तापकीर या तरुणाचा भरदिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला. लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे पिंपरी चिंचवड शहर हे क्राइम कॅपिटल बनत चालले असल्याची टीका पोलिसांवर होऊ लागली आहे.
क्राइम कॅपिटल हा ठसा पुसण्यासाठी आणि विशेषतः मावळमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आता पोलीसही मैदानात उतरले आहेत. गुन्हे शाखा युनिट पाच आणि गुंडा विरोधी पथक यांची कार्यालये तातडीने तळेगाव शहरात स्थलांतरीत करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आणि त्याची अंमलबजावणीही झाली आहे.
शहरातील टोळीयुद्ध संपविण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी यापूर्वीच मोक्का आणि स्थानबद्धवेच्या कारवाई करण्याचा सपाटा लावला. त्या अंतर्गत शहरातील नामचीन गुंड आणि टोळीतील सदस्यांना पोलिसांकडून यापूर्वीच अटक करण्यात आली.
शहरातील अनेक कुख्यात गुंड कारागृहात शिक्षा भोगत होते. याशिवाय वस्त्यांसाठी धोकादायक असलेल्या अनेक कुख्यात गुंडांना शहरातून हद्दपार करण्यासही सुरुवात केली.आता मोक्कातील काही गुन्हेगार जामिनावर सुटले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईतील केली जात आहे. या व्यतिरिक्त काही गुन्हेगार शहरात अद्यापही सक्रिय आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा टोळीयुद्ध आणि गुन्हेगारी कारवाया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धुमश्चक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तंत्रज्ञानाची मदत
गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच मोबाइल लोकेशन ट्रेस करणे, गुन्हेगार वापरत असलेल्या नंबरवर नजर ठेवणे, ठशांची माहिती अद्ययावत करणे आदींचा आधार घेतला जाणार आहे.
टॉप-20 गुन्हेगार
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 18 पोलीस ठाण्यांमध्ये “टॉप 20′ गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्यावर पोलीस विशेष नजर ठेवणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.