राहाता – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाने जर्मनीमधील नामांकित व्याटक्राफ्ट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि नेक्स्ट टू सन एर्जी या सौर उर्जा तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपन्यांशी सामंजस्य करार केल्याची माहिती महसूलमंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मुंबई येथील हॉटेल ताजमध्ये सौर उर्जा प्रकल्पा संदर्भात झालेल्या विशेष बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जर्मनी देशाचे व्हाइस चान्सलर रॉबर्ट हाव्यक व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमवेत या सामजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. कृषी महाविद्यालच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे या संस्थेच्या वतीने उपस्थित होत्या.करारानुसार जर्मनीतील या दोन कंपन्या प्रवरेच्या कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरती व्हर्टीकल बायफेसिअल सोलर तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तयार करणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांना नेहमीची शेती करीत असतांना सौर उर्जा निर्मिती करणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञान हे नेक्स्ट टू सन एर्जी या कंपनीने विकसित केलेले असून संपूर्ण जगभरामध्ये याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम व्याटक्राफ्ट इंडस्ट्रीज प्रा. लि ही कंपनी करणार आहे. या प्रात्यक्षिक प्रकल्पासाठी संपूर्ण भारतातून एकमेव प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाची निवड करण्यात आली असल्याचे विखे पाटील म्हणाले.