पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात जिल्हास्तरीय ऑलिंपिया गेम्स क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळच्या वतीने याचे संयोजन केले आहे. महाराष्ट्रात प्रथमच आयोजित या स्पर्धा क्रीडा क्षेत्रासाठी उपयुक्त आहे, असे प्रतिपादन ऑलिंपिक वीर पैलवान मारुती आडकर यांनी केले.
डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच जिल्हास्तरीय ऑलिंपिया गेम्स क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन ऑलिंपिक वीर पैलवान मारुती आडकर यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख, सचिव डॉ. पुरुषोत्तम उपर्वट, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती धनवटे, महामंडळाचे संचालक निवृत्ती काळभोर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत संचालन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी महामंडळाचे सचिव महादेव फपाळ, खजिनदार नीळकंठ कांबळे तसेच रज्जाक पानसरे, सरजीत कौर, आशा पालवे, कीर्ती पाल, सीमा भोसले, विद्याराणी वाल्हेकर, नितीन काकडे, राजेश यादव, अनिल जगताप, मुकेश बिरांजे, राकेश प्रसाद, आशिष मालुसरे, राम मुदगल, राधिका काळे, वैशाली इंदलकर, रेणू शर्मा आदी उपस्थित होते.
मुलांच्या फुटबॉल स्पर्धेतील पहिला सामना एसबी पाटील पब्लिक स्कूल (रावेत) विरुद्ध एसएनबीपी (मोरवाडी पिंपरी) संघ यांच्यात झाला. हा सामना एसएनबीपी संघाने जिंकला. दुसऱ्या सामन्यात एसपीएम संघ विजयी झाला. तिसरा सामना प्रियदर्शनी स्कूलने जिंकला. या बरोबरच एसएनबीपी (बी) मोरवाडी, एसएनबीपी (ए), प्रतिभा स्कूल यांनी विजयी पताका फडकवली.