पिंपरी-चिंचवड पालिका पदाधिकाऱ्यांना दौऱ्यांचा मोह अनावर

विरोधक असताना करत होते दौऱ्यांवर टीका : सत्तेत आल्यावर दौऱ्यांना मंजुरी

– प्रकाश गायकर

पिंपरी – राष्ट्रवादीच्या सत्तेच्या अखेरच्या काळात महापौरांच्या दौऱ्यांवरून विरोधक असलेल्या भाजपने सभागृह दणाणून सोडले होते. सतत सत्ताधाऱ्यांच्या दौऱ्यांवर टीका करणाऱ्या भाजपची सध्या महापालिकेवर सत्ता आहे. पुढच्या वर्षी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आहे. दौऱ्यांच्या कायम विरोधात असणाऱ्या भाजपला मात्र आता निवडणुकीपूर्वी विविध ठिकाणच्या दौऱ्यांचा मोह सुटला आहे. राष्ट्रवादीच्या विविध दौऱ्यांवरून केलेल्या राजकारणाचा आता भाजपला विसर पडला आहे का अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची महापालिकेमध्ये सत्ता असताना सतत होणाऱ्या दौऱ्यांवरून विरोधी भाजपने त्यांना चांगलेच लक्ष केले होते. राष्ट्रवादीच्या सुरूवातीच्या काळात सत्तारुढ नेते, स्थायी समिती सभापती यांच्यासह विरोधी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी गुप्तता ठेवत अमेरिका दौरा केला. त्यावेळी रखडलेल्या कामांमुळे त्यांचा दौरा चांगलाच चर्चेत आला.

त्यानंतर तत्कालीन महापौर मोहिनी लांडे या देखील नगरसेविकांसह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेल्या. तर अखेरच्या काळात तत्कालीन महापौर शंकुतला धराडे या दौऱ्यांवर गेल्या. याचेच भांडवल करत विरोधक असलेल्या भाजपने राष्ट्रवादीला चांगलेच धारेवर धरले. पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही दौऱ्यांवर जात असल्याने विकासकामे रखडत असल्याचा आरोप करत महासभा दणाणून सोडली.

मात्र, आता सत्तेत आल्यावर तेच भाजपचे पदाधिकारी दौऱ्यांबाबत बघ्याच्या भूमिकेत आहेत. गेल्या दोन महिन्यामध्ये भाजपच्या नगरसेवकांच्या तीन दौऱ्यांना मान्यता देण्यात आली आहे. सुरुवातीला महिला व बालकल्याण समितीने अधिकाऱ्यांना माहिती न देता गूपचूप केरळ दौरा केला. तर त्यानंतर क व ई क्षेत्रीय समितीच्या नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षणासाठी जम्मू काश्‍मीरचा दौरा करण्याचे निश्‍चित केले आहे. तसेच विधी समितीनेही सिक्कीम दौऱ्याचे आयोजन केले आहे. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. काही पदाधिकारी दौऱ्याला जाऊन आले आहेत तर काही पदाधिकारी आता दौऱ्यावर जाणार आहे.

त्यांची उधळपट्टी, आमचे अभ्यास दौरे
शहरापुढे अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, पाणी टंचाई यासारखे कित्येक प्रश्‍न आहेत. तर दुसरीकडे करोना विषाणूच्या संक्रमणामुळे पालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. मात्र महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना याची तमा नसल्याचे लागोपाठ सुरू असणाऱ्या दौऱ्यांवरून दिसून येते. राष्ट्रवादीच्या काळात पदाधिकाऱ्यांनी केलेल्या दौऱ्यांना भाजपच्या याच नगरसेवकांनी कडाडून विरोध केला होता. तर पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यांमुळे पैशांची कशी उधळपट्टी होते व विकासकामे रखडतात हे सभागृहामध्ये ढासून सांगितले होते. मात्र आता तेच विरोधक सत्तेत आल्यावर दौऱ्यांची व्याख्या बदलली आहे. तेव्हाचे दौरे उधळपट्टी म्हणून केले जात असल्याचा आरोप होत होता. तर आताचे दौरे हे अभ्यासासाठी केले जात असल्याचा दावा केला जात आहे.

विरोधकांचीही चुप्पी
या लागोपाठ निश्‍चित केलेल्या दौऱ्यांबाबत महापालिकेतील विरोधी पक्षानेही चुप्पी साधली आहे. करोनाच्या काळातही पालिकेच्या पैशांवर असे दौरे आयोजित केले जात आहेत. मात्र यावर विरोधी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी काहीच बोलत नाही. त्यामुळे भाजपकडून एका पाठोपाठ एक दौरा आयोजित केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.