पिंपरी – येत्या चार दिवसांत देशाचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. एक फेब्रुवारी रोजीच या अर्थसंकल्पात नक्की काय आहे ते कळेल, उद्योग तसेच विविध क्षेत्रांप्रमाणे सर्वसामान्य मध्यमवर्गाला या अर्थसंकल्पाकडून खूपच अपेक्षा आहे. मे 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्याने हे या सरकारचे शेवटचे पूर्णकालीन बजेट असणार आहे. त्यामुळे सरकार या बजेटमध्ये मध्यम वर्गाचा विशेष विचार करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
करोनाकाळात कमी झालेला रेपो रेट स्थिती पूर्वपदावर येताच पुन्हा वाढविण्यात आला. यामुळे सर्व कर्जाचे हप्ते वाढले. यातून दिलासा देण्याची मागणी प्रामुख्याने होत आहे. तसेच प्राप्ती कराचा स्लॅब वाढविण्यात यावा आणि स्टॅंडर्ड डिडक्शनची लिमिट वाढविण्याची मागणी होत आहे.
महागलेले गृहकर्ज
महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी रिझर्व्ह बॅंक दर तिमाहीला रेपो रेटमध्ये वाढ करत आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सर्वच प्रकारची कर्जे महाग होत आहेत. इतर कर्जांच्या तुलनेत गृहकर्ज महागल्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. उत्पन्नात विशेष वाढ झालेली नसताना आधी घेतलेल्या गृह कर्जाचे हप्ते मात्र वाढत असल्याने मध्यमवर्ग त्रस्त होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षा आहे की अर्थसंकल्पात होमलोन पेमेंटसाठी ठेवण्यात आलेली मर्यादा, व्याज आणि मुद्दल यात वाढ करण्यात यावी. सध्या गृहकर्जावरील व्याजासाठी प्राप्तीकर कलम 24 (ब) अंतर्गत दोन लाखांपर्यंतची मर्यादा आहे. ही मर्यादा पाच लाख करण्याची मागणी जोर धरत आहे.
बांधकाम क्षेत्रालाही तीच अपेक्षा
जी अपेक्षा सर्वसामन्य नागरिकांना आहे तीच अपेक्षा बांधकाम व्यावसायिक देखील व्यक्त करत आहेत. गृहकर्जावरील व्याज आणि मुद्दल याबाबतील प्राप्तीकर कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या सवलतीत वाढ व्हावी. असे झाल्यास बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. या अर्थसंकल्पात कर सवलतीची मर्यादा पाच लाखांपर्यंत करण्याची मागणी बांधकाम व्यावसायिक करत आहेत. तसेच गृहकर्जावर प्रिंसिपल अमाउंटच्या सवलतीची मर्यादा कलम 80 सी अंतर्गत दीड लाख रुपये आहे तसेच कलम 80 ईईई अंतर्गत पहिल्यांदा घर विकत घेणाऱ्यांना गृह कर्जाच्या व्याजावर 50 हजार रुपये अतिरिक्त कर सूट आहे. यात गेल्या अनेक वर्षांपासून वाढ करण्यात आलेली नाही. टॅक्स सब्सिडी दोन लाख करण्याची गरज आहे. सध्या घराच्या किंमती वाढल्या असून विक्री मंदावली आहे. अशा प्रकारचे निर्णय घेतल्यास मध्यमवर्गीय घर घेण्याबाबत विचार करतील.