पुसेगाव – पुसेगाव (ता. खटाव) येथील काळजाई परिसरात आज शनिवार दि. 28 रोजी दुपारी दीडच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे नामदेव मारुती जाधव यांच्या शेतातील ऊसाला आग लागून दोन लाखांचे नुकसान झाले. याबाबतची माहिती देताच विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली.
साधारण एक एकर परिसरातील ऊस जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत नामदेव जाधव यांनी सांगितले की काळजाई परिसरात एमएसईबीची वीज वितरण व्यवस्था नेहमी अडथळ्याची ठरली आहे. डीपीची दुरवस्था, झाडामधून गेलेल्या विद्युत तारा, मोडकळीस आलेले विद्युत खांब आणि कर्मचाऱ्यांची उदासीनता यामुळे या परिसरात वीज वितरणाबाबत अनेक समस्या उदभवत असतात. त्याचाच परिणाम म्हणून आज शॉर्टसर्किटमुळे आमचे ऊसजळीताचे अंदाजे दोन लाखांपर्यंतचे नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित विभागाने गांभीर्याने विचार करून विद्युत वितरण व्यवस्था सुधारावी. तसेच आज झालेल्या नुकसानाची जबाबदारी स्वीकारून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, असे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.