पिंपरी – नव्या तंत्रज्ञानाचे तसेच आर्थिक गरजेनुसार वीजवापराच्या नियोजनाचा अधिकार देणारे स्मार्ट प्रीपेड वीजमीटर लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांकडे मोफत बसविण्याचे नियोजन महावितरणकडून पूर्णत्वास आले आहे. परिणामी पिंपरी चिंचवड शहरातील वीज ग्राहक स्मार्ट होणार आहेत. पुणे जिल्ह्यात लघुदाब वीजग्राहक ३६,३३,८९९ आहेत.
विजेच्या व नवीन वीजजोडण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वितरण यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतून लघुदाब वीजग्राहकांकडे प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे. येत्या मार्चपासून हे मीटर टप्प्याटप्प्याने काम सुरू होईल.
वेळ, श्रम् वाचणार
सध्याच्या वीजमीटर प्रणालीमध्ये ग्राहकांकडे जाऊन दरमहा मीटरचे फोटो रीडिंग घेणे, त्यानुसार वीजबिल तयार करणे व बिलांचे वितरण करणे या प्रक्रियेत काही दिवसांचा कालावधी लागतो. तसेच घराला कुलूप असल्याने रीडिंग न घेता येणे, चुकीचे असल्यास दुरुस्ती करणे, मीटर नादुरुस्त होणे तसेच वीजबिलांचा भरणा न होणे, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे आदी कारणे उद्भवतात. त्यामुळे स्मार्ट मीटरिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये
वीजग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत देण्यात येईल. विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरून वीज वापरता येईल. त्यामुळे वीज वापरावर किती खर्च करायचा, किती वीज वापरायची याचे नियोजन करणे ग्राहकांना शक्य होईल. ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइनद्वारे रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज वीज किती वापरली, रक्कम किती शिल्लक आहे व रिचार्ज संपत आल्याची माहिती मोबाइलद्वारे मिळत राहील. तसेच स्मार्ट मीटरमधील रिचार्जची रक्कम सायंकाळी सहा ते सकाळी १० वाजेपर्यंत संपली तरी वीजपुरवठा सुरु राहील. मात्र, संबंधित ग्राहकांनी दुसर्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत रक्कम भरून वीजपुरवठा सुरु ठेवणे आवश्यक आहे. भरलेल्या रकमेतून रिचार्ज संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होतील अशी सुविधा आहे.
बिलांच्या तक्रारी संपुष्टात येतील
वीजग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटर उपयुक्त आहेत. त्यामुळे विजेवरील खर्च नियंत्रणात राहील. तसेच पाहिजे तेवढाच वीजवापर करता येईल. स्मार्ट मीटरमुळे प्रामुख्याने वीज बिलांच्या तक्रारी संपुष्टात येतील, अशी माहिती पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.