चिखली – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरवासीयांकडून साफसफाईसाठी कर वसूल केला जातो. शहरातील रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयानुसार टेंडर काढण्यात येते. त्यासाठी लाखो रुपये खर्च केला जातो. परंतु आज शहरातील बहुतांश रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या कडेला मातीचे ढीग साचले आहेत. परंतु प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना रस्त्याने चालणे मुश्कील झाले आहे. तरी महापालिकेने ज्या रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग आहेत ते साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आरोग्य विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांची व सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करण्यात येते. त्यासाठी कोट्यवधी रुपये महापालिका ठेकेदारांवर खर्च करत आहे. परंतु अधिकारी व ठेकेदार यांच्यात मिलिभगत असल्याने उद्योगनगरीतील बहुतांश रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य व मातीचे ढीग दिसून येत आहेत. आठही प्रभागातील महत्त्वाचे रस्ते तेवढे दररोज आरोग्य विभागाकडून साफसफाई केली जात आहे.परंतु या रस्त्यांवरील कचरा गोळा करून ढीग लावला जात आहे. तो कित्येक महिने तसाच असतो. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणारी वाहने त्यावरून गेल्यास मोठ्या प्रमाणावर मातीचे कण हवेत उडत आहेत. त्यामुळे चार चाकी वाहने व इतर वाहनांच्या मागे चालणाऱ्या दुचाकी, पादचारी नागरिकांच्या नाका, डोळ्यांमध्ये धूळ जात आहे. परंतु महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने ठेकेदारांचे चांगलेच फावले आहे.
या परिसरात आढळतात मातीचे ढीग
पिंपरी-चिखली मार्गावर कुदळवाडी परिसरात.
कृष्णानगर चौक ते गोडाऊन चौक स्पाइन रोड.
त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक
देहू-आळंदी मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यात कचरा आहे.
कचरा उचलण्याकडे कानाडोळा
पिंपरी-चिखली मार्गावरील कुदळवाडी परिसरातील रस्ते सफाई करून एकत्र केलेला कचरा व माती आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून उचलली जात नाही. परिणामी हीच माती पुन्हा वाहने जाऊन रस्त्यावर पसरत आहे. याकडे ठेकेदार व आरोग्य विभागाचे कर्मचारी कानाडोळा करत असल्याने नागरिकांना या रस्त्याने प्रवास करणे कठीण झाले आहे. बऱ्याच वेळा आरोग्य विभाग कचरा व माती उचलून न नेहेता रस्ता दुभाजकात टाकून देतात. त्यामुळे रस्ता दुभाजकात लावल्या झाडांच्या बुंद्यात चढ होऊन महापालिका झाडांना पाणी सोडते परंतु ते त्यांच्या मुळाला न पोहचल्याने झाडे सुकून चालली आहेत. तरी येथील मातीचे ढीग त्वरित साफ करावेत, अशी मागणी होत आहे.
वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील चिखली, कुदळवाडी, जाधववाडी, देहू-आळंदी मार्ग आदी भागात लहान मोठे उद्योग आहेत. तसेच भंगार व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करतात. त्यामुळे भंगाराची वाहने या चिखली-पिंपरी मार्गावरून ये-जा करताना वाहनामधील लोखंडी बर, खिळे, लहान अकाराचे पत्रे रस्त्यावर पडून दुचाकीच्या टायरमध्ये शिरल्याने दुचाकी पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु आरोग्य विभागाने रस्ते सफाई प्रमाणिकपणे केली तर ही समस्या उद्भवणार आहे. परिणामी शहरातील नागरिकांना एकीकडे कर भरणा तर दुसरीकडे वाहनांचे नुकसान होऊन आर्थिक झळ सोसावी लागत आहे. दुसरीकडे पादचारी आणि दुचाकी चालकांच्या डोळ्यांमध्ये माती गेल्याने इजा होत आहे. त्यामुळे येथील रस्ते सफाई दररोज करण्याची मागणी होत आहे.