उपनगर टीम, दि. 15 (वार्ताहर) – भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सहभागातून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
जुनी सांगवी येथे ‘जागर स्वावलंबी शिक्षणाचा’ उपक्रम
सांगवी -जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल, लिटल फ्लॉवर विद्यालय, भारतीय विद्यानिकेतन प्रशाला, अरविंद एज्युकेशन ज्युनिअर कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त “जागर स्वावलंबी शिक्षणाचा’ हा उपक्रम घेण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव प्रणव राव, मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, मुख्याध्यापिका नीलम पवार, मुख्याध्यापिका आशा घोरपडे, अरविंद एज्युकेशन ज्यूनिअर कॉलेजच्या प्राचार्या शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करीत त्यावर चर्चा केली. प्रशालेच्या व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घरोघरी वृत्तपत्रांचे वाटप करून डॉ. कलाम यांना अनोखी आदरांजली वाहिली. अध्यक्षा आरती राव यांनी विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत त्यांचा जीवनपट कथन केला. पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षिका मनिषा घुले यांनी सूत्रसंचालन केले.
एम. एम. विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ प्रदर्शन
पिंपळे निलख -काळेवाडी येथील एम. एम. विद्यामंदिरात इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गासाठी वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा केला. या वेळी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ प्रदर्शन भरविले.
वर्गशिक्षकांनी वेगवेगळ्या पुस्तकांचे वर्गामध्ये वाचन केले. ग्रंथालय प्रमुख एस. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथ प्रदर्शन भरविले होते. विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनाचा आनंद घेतला. प्रदर्शनाचे उद्घाटन शालेय मुख्यमंत्री विद्यार्थी चिरंजीव निनाळे व शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही. एस. वाल्हेकर यांनी केले. पी. एम. जत्ते, एस. यु. शिंदे, पी. डी. चव्हाण व इतर शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
वाचन संस्कृती आणि आजची तरुणाई’ व्याख्यानाचे आयोजन
पिंपळे निलख -वर्गातील शिक्षण आणि वर्गाबाहेरचे शिक्षण यात खूप फरक असतो. जगण्याचे शिक्षण वाचनातून मिळते. पुस्तकातून माणसाचे मन, व्यक्तित्व समजते. मराठी साहित्य खूप समृद्ध आहे. वाचन व्यक्तीला समृद्ध बनवते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले.
खडकी येथील टीकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते “वाचन संस्कृती आणि आजची तरुणाई’ या विषयावर मार्गदर्शन करीत होते. डॉ. चाकणे यांनी या वेळी अनेक पुस्तकांचे दाखले देत कुठलेही पुस्तक वाचण्यासाठी वर्ज्य नसते, असे सांगत विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित केले. तसेच पुस्तक वाचताना ते मनाला भिडले पाहिजे. थोडं वाचावं पुस्तक मिटावं मनन करावं पुढे लेखकाने काय लिहिले असेल याचा विचार करावा आणि मगच पुढे जावे. असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या वेळी प्रा. डॉ. अर्जुन मुसमाडे, डॉ. स्वाती राजन, प्रा. गौरी माटेकर, प्रा. अस्मिता शिरसाठ, प्रा. तेजस्विनी शेंडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. महादेव रोकडे व ग्रंथालयाचे प्रा. आनंद नाईक, प्रा. अर्चना तारू, योगिता चव्हाण, चैत्राली जोशी यांनी केले. यानिमित्त आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनास भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या ग्रंथांची माहिती घेतली.