पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा 128 शाळा आहेत. या शाळांमध्ये मुलींची संख्या मोठी आहे. मुलींच्या मासिक पाळीवेळी त्यांची मोठी कोंडी होत असल्याने महापालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविण्यात आल्या आहेत. मात्र, या मशीनची दुरावस्था झाली आहे. या मशीनची दुरूस्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शहर सचिव सीमा बेलापुरकर यांनी केली आहे.
शाळांमधील सॅनिटरी नॅपकीन मशीन दुरूस्त न केल्यास महिला मनसे सेनेकडून शिक्षण अधिकाऱ्यांना सॅनिटरी नॅपकीन मशीन भेट देऊन निषेध केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.याबाबत बेलापुरकर यांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांना निवेदन दिले आहे.
यावेळी अश्विनी बांगर, अनिता पांचाळ उपस्थित होत्या. निवेदनात म्हटले आहे की, शहरात महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा 128 शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे 44 हजार पेक्षा जास्त मुले आणि मुलीं आहेत. महापालिका शाळांमध्ये शाळेत शिकणारे विद्यार्थी गोरगरीब कुंटूंबातील आहेत. यांच्या सोयीसाठी पालिकेचा शिक्षण विभाग विविध सोई-सुविधा देत आहे. महापालिका शाळा आणि क्षेत्रीय कार्यालयामध्ये सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविल्या आहेत. मात्र, पालिकेच्या अनेक शाळांची पाहणी केल्यानंतर सॅनिटरी नॅपकीन मशीनची दुरावस्था झाली असून रिकाम्या आहेत. या मशीनची दुरूस्ती करून मुलींसाठी त्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी बेलापुरकर यांनी केली आहे. तसेच शाळांमधील सॅनिटरी नॅपकीन मशीन दुरूस्त न केल्यास महिला मनसे सेनेकडून शिक्षण अधिकाऱ्यांना सॅनिटरी नॅपकीन मशीन भेट देऊन निषेध केला जाईल, असा इशाराही मनसेच्या सीमा बेलापूरकर व इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.