नव्याने 13 रुग्णांची भर; बाधितांमध्ये मुंबई येथील एका रुग्णाचा समावेश
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने गुरुवारी (दि. 21) अडीचशेचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारी नव्याने 13 रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहराबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. तर शहरातील 12 जणांचे अहवाल “पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 252 झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने बुधवारी करोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल गुरुवारी सकाळी व दुपारी अशा दोन टप्प्यात आले. सकाळी आलेल्या अहवालामध्ये शहरातील पाच जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तर मुंबई येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पहिल्या टप्प्यात आलेल्या अहवालानुसार शहरात आढळून आलेले पाच रुग्ण हे रुग्ण पिंपळे सौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी व पिंपरी या भागातील आहेत. यामध्ये तीन पुरुषांचा व दोन महिलांचा समावेश आहे. या पाचही रुग्णांचे वय 23 ते 65 वर्षे या दरम्यान आहे.
तर दुपारी आलेल्या अहवालामध्ये शहरातील आणखी सात जणांचे अहवाल “पॉझिटिव्ह’ आले. हे सातही रुग्ण चिंचवड स्टेशन व दिघी येथील रहिवाशी आहेत. त्यामध्ये दोन पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे, या रुग्णांचे वय 12 ते 45 या दरम्यान आहे. गुरुवारी दिवसभरात 13 जणांचे अहवाल “पॉझिटिव्ह’ आले. त्यामध्ये मुंबई येथील एका रुग्णांचा समावेश आहे. तर उर्वरित बारा रुग्ण शहरातील रहिवाशी आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान आजपर्यत शहरातील 142 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत शहरात 109 सक्रिय रुग्णांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज पुन्हा नव्याने 221 संशयित महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाले असून, त्यांच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आहेत. बुधवारी प्रतिक्षेतील व आजच्या संशयीतांसह एकूण 309 जणांचे अहवाल अद्यापही प्रतिक्षेत आहेत. आतापर्यंत एकूण 4 हजार 983 जणांची करोना तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 4 हजार 434 संशयितांचे अहवाल “निगेटिव्ह’ आले आहेत.