पाटण -पाटण तालुक्यात करोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारी म्हणून कडक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. शिरळ येथील करोनाबाधित रूग्ण, बनपुरी येथील मयत महिला व भारसाखळे येथील संशयीत मृत व्यक्तीच्या निकट सहवासीत 46 विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तातडीची उपाययोजना म्हणून शिरळ, बनपुरी, शितपवाडी, कंकवाडी, मंद्रुळकोळे, मालदन, काळगाव, भारसाखळे ही आठ गावे पूर्णतः सिल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली.
कोयना विभागातील शिरळ येथील एका 70 वर्षाच्या व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित रूग्ण हा मंगळवारी कोयनानगर विभागातील हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र त्यानंतर पाटण येथील एका खासगी रुग्णालय तेथून ग्रामीण रूग्णलय पाटण आणि सरतेशेवटी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे उपचारासाठी दाखल झाला. त्याच्या निकट सहवासीत कुटुंबीय, संपर्कात आलेले डॉक्टर्स त्यांचे कर्मचारी यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. बनपुरी येथील मयत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या नातेवाईक व संपर्कातील लोकांनाही पाटण करोना केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे.
याशिवाय भारसाखळे येथील 42वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ससून रुग्णालय, पुणे येथे झाला. त्याला रूग्णवाहिकेतून मुळगावी आणले जात होते. मात्र, प्रशासनाने संबंधित मृतदेह हा गावाच्या सिमेवरच अडवून तो कराडला पाठवला. तेथेच त्याच्यावर शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्याची पत्नी, मुलांसह इतरांनाही पाटण येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे.
तालुक्यातील हाय रिस्कमधील डॉक्टर्सना होम क्वारंटाइन तर इतरांना पाटण येथील करोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी म्हासोली येथील करोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या तळमावले येथील 9 जण व त्यानंतर मराठवाडी (दिवशी) येथील एक असे दहा तर आता एकूण 46 व्यक्तींना क्वारंटाइन केले आहे.
यापैकी सुरूवातीला आलेल्यांचे सोमवारी व मंगळवारी स्वॅप नमुने घेण्यात आले. तर उर्वरित लोकांचे बुधवारी स्वॅप नमुने घेण्यात आले आहेत. दरम्यान करोना पार्श्वभूमीवर तातडीने संबंधित रूग्णांची व संपर्कात आलेल्या गावांपैकी शिरळ, बनपुरी, शितपवाडी, कंकवाडी, मंद्रुळकोळे, मालदन, काळगाव, भारसाखळे आदी कंटेनमेंट क्षेत्रात मोडणाऱ्या गावात येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांवर बंदी घातली आहे. सर्वच रस्ते बंद करून तेथे चेकनाके तयार केले आहेत. त्याठिकाणी पोलीस व शिक्षक तैनात करण्यात आले आहेत.