पिंपरी-चिंचवडमधील भाजपा आमदाराचा भाऊ शिवसेना, राष्ट्रवादीकडून “ट्रोल’

  • सत्तेच्या हव्यासापोटी लहान मुलांनाही उन्हात केल उभे – आदित्य ठाकरे

पिंपरी – महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील भाजपा आमदाराच्या भावाने आपल्या कुटुंबातील लहान मुलांना भर उन्हात उभे केल्यामुळे आमदाराचा भाऊ चांगलाच ट्रोल झाला आहे. शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांनी तर या प्रकाराचा निषेध केला आहे. तर राष्ट्रवादीच्या राज्य पातळीवरील नेत्यांनीही या प्रकारावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. करोनाला रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, सरकारच्या निषेधार्थ भाजपने आज (शुक्रवारी) राज्यभरात ठिकठिकाणी राज्यभरात “मेरा आंगण, मेरा रणांगण’: महाराष्ट्र बचाओ’ हे आंदोलन केलं.

राज्यातील अनेक नेत्यांनी सोशल डिस्टंन्सिंग करत आंदोलन केले. तसेच “काळ्या रंगाचे मास्क, शर्ट, रिबीन, फलक घेऊन नेत्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. मात्र पिंपरी -चिंचवडमधील भाजपा आमदाराच्या एका भावाने घरातील लहान मुलांना कडकडीत उन्हात उभे करत हे आंदोलन केले. विशेष म्हणजे या मुलांनी मास्कही घातले नव्हते. तर दहा वर्षांखालील मुलांना घराबाहेर बंदी असतानाही त्याचे पालन न करता या आंदोलनात सहभाग नोंदविला.

हा प्रकार समोर आल्यानंतर पर्यटनमंत्री यांनी हा फोटो ट्‌विट करत भाजपावर सडकून टीका केली. भाजपा नेत्यांना सत्तेचा इतका हव्यास निर्माण झाला आहे की, त्यांनी आपल्या मुलांनाही भरउन्हात उभ केल्याच ट्‌विटमध्ये म्हटले आहे. भाजपकडून खालच्या पातळीचे राजकारण होत असून, एक विश्वविक्रमच केला जात आहे. राजकारणात पूर्णपणे लिप्त झालेला जगातील एकमेव पक्ष आहे. हे जग सर्व काही विसरून एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येत असताना, हा पक्ष भीती, द्वेष आणि फूट पाडण्याचे काम करत आहे. भाजप करोनाचं संकट विसरून गेला आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हा फोटो ट्‌विट करत सत्तेसाठी हे लोक आपल्या मुलांचे जीवही धोक्‍यात घालायला तयार असल्याची टिका केली आहे. उमेश पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या अनेकांनी हा फोटो ट्‌विट केल्याने पिंपरी-चिंचवड शहरात आज भाजपाच्या आंदोलनापेक्षा हाच विषय अधिक चर्चेचा ठरला होता.

“त्यावेळी’ ऊन नव्हते – कार्तिक लांडगे
महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपाने पुकारलेल्या आंदोलनात आमच्या कुटुंबातील मुलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. सकाळी साडेदहा वाजता आम्ही आंदोलन केले होते. त्यावेळी ऊन नव्हते. जबरदस्तीने आम्ही कोणालाही आंदोलनात सहभागी केले नव्हते, अशी प्रतिक्रिया कार्तिक लांडगे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×