लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने काम करा त्यांना विश्वासात घ्या- अजित पवार

पुणे-करोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

विधानभवन येथे शुक्रवारी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची आढावा बैठक पवार यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, गिरीश बापट , आमदार सिध्दार्थ शिरोळे, लक्ष्मण जगताप, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, सुनील शेळके, महेश लांडगे, आण्णा बनसोडे आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, खासगी हॉस्पिटलचे 80 टक्के बेड ताब्यात घेण्यात येणार आहेत. आपल्या सूचनांची प्रशासन निश्‍चित दखल घेईल. वेळोवेळी बैठका घेतल्या जातील. आपल्या सूचना वेळोवेळी पाठवा,असेही त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार चव्हाण म्हणाल्या, सोशल मिडिया अधिक सक्रिय केला पाहिजे. करोनाच्या बाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजना व प्रशासनाच्यावतीने सामान्य नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या सूचनांची रोजच्या रोज माहिती दिली जावी. जेणेकरुन लोकप्रतिनिधींना माहिती मिळेल.
खासदार बारणे यांनी वेळोवेळी प्रशासनाने लोकप्रतिनिधींना अद्ययावत माहिती द्यावी,अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रामीण रुग्णालये अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगितले.

खासदार बापट म्हणाले, परराज्यातील मजूर त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी अधिकाधिक रेल्वेची व्यवस्था करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींना माहिती वेळोवेळी देण्यात यावी. पोलिस प्रशासनानेही समन्वय ठेवावा. पुणे कॅंटोन्मेंटला आणखी निधी द्यावा.

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी करोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न करण्यात येत आहे. सनदी अधिकाऱ्यांवरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. योग्य तो निधी जिल्ह्याला उपलब्ध करून दिला आहे. सर्व यंत्रणा समन्वयाने काम करीत आहे, असे सांगितले.

जमाबंदी आयुक्त एस.चोकलिंगम यांनी ससून हॉस्पिटलबाबत माहिती देताना सांगितले, मृत्यू दर आता कमी झाला आहे. ससूनची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.