kutimb

पिंपरी चिंचवड : कारण गुलदस्त्यात ठेवत महासभा तहकूब

गोंधळाचा दुसरा अंक टाळण्यासाठी सभा तहकूब केल्याची चर्चा


सत्ताधाऱ्यांनी दिली नाही विरोधाची संधी

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची तहकूब महासभा आज दुपारी महापालिका मुख्यालयामध्ये होती. मात्र अवघ्या पाच मिनिटांच्या कालावधीत ही सभा तहकूब करण्यात आली. मागील सभेमध्ये स्थायी समितीच्या सदस्य निवडीवरून सभागृहात मोठा गोंधळ झाला होता. त्यावरून शिवसेना व राष्ट्रवादी आक्रमक झाली होती. त्याचाच दुसरा अंक आज महासभेमध्ये घडण्याची दाट शक्‍यता होती. या भीतीपोटीच भाजपने आजची महासभा तहकूब गेल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समितीच्यी सदस्य निवडीवरून गुरुवारी (दि. 18) भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. स्थायी समिती सदस्य पदाच्या एका जागेसाठी अपक्ष आघाडीतर्फे अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी नीता पाडळे यांचे नाव पत्राद्वारे सुचविले होते. गटनेता अनुपस्थित असताना सदस्य नियुक्तीबाबत निर्णय घेत असल्याने चुकीचा पायंडा पडत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. यामधूनच शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली.

प्रकरण एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत गेले. या गोंधळात महापौरांनी स्थायी समितीच्या सदस्यांची नावे जाहीर करून सभा तहकूब केली. मात्र हे चुकीच्या पद्धतीने झाले असल्याचा आरोप राष्ट्रवादी व शिवसेनेने केला. आजच्या सभेमध्ये आंदोलन करण्याचा पवित्रा विरोधकांनी घेतला होता. त्यामुळे आज सभागृहामध्ये गोंधळाची परिस्थिती ओढावण्याची शक्‍यता जास्त होती.

गुरुवारची तहकूब सभा सोमवारी दुपारी दोन वाजता सुरू झाली. राष्ट्रवादी व शिवसेनेचे सदस्य बाहेरच होते. सदस्य अनुपस्थित असल्याचा फायदा घेत सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. त्याला भाजपचे विकास डोळस यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर ही सभा 9 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. मागील बैठकीत झालेल्या गोंधळाचा आज दुसरा अंक सभागृहामध्ये घडेल या भीतीने भाजपने सभा तहकूब केली असल्याची चर्चा दिवसभर पालिका वर्तुळात रंगली होती.

स्थायी सभापतीवर महासभेतील दोन विषय अवलंबून
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे. आता सभापती पदासाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणूक होणार आहे. स्थायीचे सभापती पद भोसरी की चिंचवड गटाला मिळते यावर देखील महासभा अवलंबून आहे. सभेमध्ये गांधीनगर झोपडपट्टी पुनवर्सन व यांत्रिक पद्धतीने रस्ते साफसफाई हे दोन महत्त्वाचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. स्थायीचे सभापती पद कोणत्या गटाला मिळते यावर त्या दोन विषयांचे भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही महासभा तहकूब करण्यात आल्याचीही चर्चा आहे.

विरोधकांचे भाजप हटाओ, पीसीएमसी बचाओ
दरम्यान आजच्या महासभेमध्ये आंदोलन करण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहामध्ये भाजप हटाओ, पीसीएमसी बचाओ या घोषवाक्‍याचे ऍप्रन घातले होते. मात्र विरोधकांनी सभागृहात प्रवेश करण्यापूर्वीच भाजपने सभा तहकूब केली.

महापौरांना काही खासगी काम होते. तसेच आज स्थायी समितीची विशेष सभा देखील होती. तसेच महापौरांच्या पायाला थोडीसी दुखापत झाली असल्याने आजची महासभा तहकूब करण्यात आली.
– नामदेव ढाके, सत्तारुढ पक्षनेते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.