पिंपरी- राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे शहरातही मोठे बदल दिसून येत आहेत. एकनाथ शिंदे भाजपसोबत गेल्यानंतर मावळचे खासदार व काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. शहरातील काही नगरसेवक आणि पदाधिकारी मात्र मौन बाळगून होते. परंतु आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक झटका लागताना दिसत आहे. शिवेसनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व लवकरच ते पक्षप्रवेश करणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी मुंबईतील मुख्यमंत्री शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर त्यांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक (अपक्ष) नवनाथ जगताप, माजी नगरसेवक संपत पवार, माजी नगरसेविका अश्विनी वाघमारे हे देखील होते. कलाटे गटाचा प्रवेश झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या राजकीय क्षेत्रातील ठाकरे शिवसेनेची ताकद कमी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माथाडीचे कामगार नेते इरफान सय्यद हे शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे शहरात ठाकरे यांच्या शिवसेनेला फटका बसला. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी रविवारी (दि. 16) रात्री उशिरा मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे.
महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत कलाटे यांनी त्यांच्या पॅनेलमधील तीन शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणले होते. पक्षाने त्यांना पालिकेत गटनेते पदावर काम करण्याची संधी दिली. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीने उमेदवारी घोषित करावी, अशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. मात्र, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी दिली. तेव्हा पक्षावर नाराजी व्यक्त करत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा घेऊन अपक्ष निवडणूक लढवली. तेव्हापासून कलाटे पक्षाविषयी भूमिका व्यक्त करीत नव्हते.
काल मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यांचे नेत्तृत्त्व मान्य करत कामाला सुरुवातही केली आहे. लवकरच जाहीर प्रवेश केला जाईल.
– राहुल कलाटे, माजी नगरसेवक
शिवसेनेचे काही माजी नगरसेवक कलाटेंच्या सोबत?
माजी गटनेते राहुल कलाटे हे शिवसेनेचे शहराध्यक्ष असताना त्यांनी संपूर्ण शहरात असंख्य कार्यकर्ते जोडले. तसेच, महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आले. यातील काही माजी नगरसेवक कलाटे यांना माननारे आहेत. त्याचबरोबर 2022 च्या निवडणुकीत पराभूत झालेले माजी नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते ही त्यांच्या संपर्कात आहेत. कलाटे यांच्यासोबत ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. याबाबत माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांनी सांगितले की, राहुल कलाटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आले असून त्यांच्यासह माजी नगरसेवक संपत पवार, अश्विनी वाघमारे आणि मी असे आम्ही चौघे शिंदे यांच्यात गटात लवकरच प्रवेश करणार आहोत,