पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट होत असले तरी शहर आणि परिसरात दुग्ध व्यवसायासाठी गाय, म्हैस, शेती आणि बैलगाडा शर्यतीचे बैल, घोडा असे सुमारे दहा हजार पेक्षा जास्त जनावरे शहरात आहेत. मात्र, या जनावरांच्या उपचारासाठी सुविधा नसल्याने पशू पालकांना औंधला जिल्हा रूग्णालयात जनावरे घेऊन जावे लागतात. ही गैरसोय ओळखून महापालिका “मिनी क्लिनिक” आणि दोन क्षेत्रीय दवाखान्यांसाठी शासनाच्या पशू संवर्धन विभागाला प्रस्ताव पाठविणार आहे.
शहरात 1999 मध्ये चऱ्होली, मोशी, बोऱ्हाडेवाडीसह आदी गावे तर त्यानंतर 2008 मध्ये ताथवडे, पुनावळे या ग्रामीण भागाचा महापालिकेत समावेश करण्यात आला. मात्र, हा ग्रामीण भाग शहरात येताच चऱ्होली आणि अन्य ठिकाणी सुरू असलेले दोन दवाखाने बंद करण्यात आले आहेत. शहरात ग्रामीण भागाचा समावेश केल्यानंतरही आजही शेतकऱ्यांकडे दुग्ध व्यवसायासाठी गाय, म्हैस, शेती आणि बैलगाडा शर्यतीचे बैल, घोडा असे सुमारे दहा हजार पेक्षा जास्त जनावरे आहेत. मात्र, ही जनावरे आजारी पडल्यास त्यांच्या उपचाराची शहरात शासकीय व्यवस्था नाही. त्यामुळे पुणे, औध येथील राज्य शासनाच्या पशू संवर्धन विभागाच्या जिल्हा रुग्णालयात जनावरे उपचारासाठी घेऊन जावी लागत आहे. आजारी जनावर टेम्पोमध्ये घालून घेऊन जाणे शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वेळी जिकरीचे ठरत आहे. त्यामुळे शहरातच जनावरांसाठी शासकीय रूग्णालय व्हावे, अशी पशू पालकांची सातत्याने मागणी होत आहे. या मागणीचा विचार करून शहरात राज्य सरकारच्या पशू संवर्धन विभागाने मिनी क्लिनिक व दोन क्षेत्रीय दवाखाने उभारावेत, यासाठी महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागामार्फत शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच महापालिकेने क्लिनिक आणि दवाखान्यासाठी जागा देण्याचीही तयारी दर्शविली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अत्याधुनिक उपचारासाठी सोय होणार
दरम्यान, उपजिल्हा रूग्णालय सुरू करण्यासाठी 1 सहाय्यक आयुक्त पशू संवर्धन, 2 पशू संवर्धन अधिकारी, 1 सहाय्यक पशू संवर्धन अधिकारी, 2 पशू धन पर्यवेक्षक, 2 व्रण उपचारक यासह प्रशासकीय कर्मचारी वर्गाची आवश्यकता असणार आहे. शहरात उप जिल्हा रूग्णालय झाल्यानंतर जनावरांसाठी एक्सरे, सोनोग्राफीसह सर्व शस्त्रक्रिया, रोग निदान प्रयोगशाळा यासह अत्याधुनिक सेवा-सुविधा मिळणार आहेत.