वाल्हेकरवाडीतील दुकानाला लागलेल्या आगीत दोन सख्ख्या भावांनी प्राण गमविले. हे दोण जण दुकानाती पोटमाळ्यावर झोपले असताना ही घटना घडली. मात्र, या दुर्दैवी घटनेपुर्वी शहरातील पोटमाळे व ज्वलनशील पदार्थांचा साठा असलेला आस्थापनांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरही या आस्थापनांना नोटीस बजावली गेली नसल्याची बाब समोर आली आहे. आता या घटनेनंतर महापालिका प्रशासनाकडून बुधवारपासून (दि.24) अशा धोकादायक ठरू शकणार्या सुमारे दोन हजार आस्थापनांना नोटीस बजावल्या जाणार आहेत.
पूर्णानगर येथील हार्डवेअरच्या दुकानाला 30 ऑगस्टला आग लागून, पोटमाळ्यावर झोपलेल्या कुटुंबातील चार सदस्यांची होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर तळवडे येथील स्पार्कल मेणबत्ती तयार करणार्या कारखान्याला लागलेल्या आगीत 14 कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वस्तुंची विक्री होणार्या आस्थापनांमध्ये पोटमाळ्यावर कामगार झोपत असल्याने आग त्यांना बचाव करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने, त्यांचा मृत्यू होत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे शहरातील सरसकट सर्वच आस्थापनांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता.
दरम्यान, या सर्वेक्षणाचे काम महिला बचत गटांना देण्यात आले होते. या माध्यमातून शहरातील सुमारे 43 हजार आस्थापनांची माहिती संकलीत करण्यात आली होती. मात्र आपल्यावर कायदेशीर कारवाई होण्याच्या भीतीने अनेक आस्थापना मालकांकडू अपुरी माहिती देण्यात आली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने कठोर भुमिका घेत, शहरातील सर्वच आस्थापनांना खरी माहिती देण्याविषयी तंबी दिली होती. त्यानंतर दुकानात वस्तु विक्री व पोटमाळे असलेल्या सुमारे दोन हजार आस्थापना आढळून आल्या. मात्र या आस्थापनांना नोटीस बजावण्याचे काम सुरू करण्यात आले नव्हते. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, बुधवारपासून (दि.24) शहरातील धोकादायक ठरू शकणार्या आस्थापनांना नोटीस बजावण्याचे काम महापालिका प्रशासन हाती घेणार आहे.
शहरातील आस्थापनांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. संकलीत माहितीच्या आधारे जिवीतहानीकरिता धोकादायक ठरू शकणार्या आस्थापनांना नोटीस बजावण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
– मनोज लोणकरउपायुक्त, अग्निशमन विभाग
कुलूप बंद दुकानाच्या पोटमाळ्यावर झोपणे धोकादायक
दुकान बंद केल्यानंतर अनेक दुकानांच्या पोटमाळ्यावर रात्री अनेक कामगार झोपतात. त्यामुळे चोरीपासून संरक्षण व खोलीचे भाडेदेखील वाचत असल्याने दुकान मालक व कामगारांकडून हा मध्यम मार्ग काढला जातो. मात्र, दुकानाला आग लागल्याने या कामगारांनी जीवाच्या आकांताने शटरपर्यंत धाव घेतली, तरीदेखील बाहेरून दुकानाला कुलूप लावले असल्याने त्यांचा जीव वाचविण्याचे प्रयत्न अपयशी ठरत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पोटमाळ्यावर झोपणे धोकादायक अनेकदा अधोरेखित झाले आहे.