घ्यायला गाडीच पाठविली नाही : तीन दिवसांपूर्वी केली होती चाचणी
पिंपरी – तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या चाचणीचे अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाले. या अहवालांमध्ये पिंपरीतील गांधीनगर परिसरातील तब्बल 35 नागरिक करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. दिवसभर हे रुग्ण महापालिकेच्या वाहनाची वाट पाहत ताटकळत राहिले. सायंकाळी पाचच्या सुमारास महापालिकेने पीएमपीची बस पाठवून रुग्णांना उपचारासाठी नेले. महापालिकेकडून होत असलेल्या विलंबामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला.
महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीमध्ये तीन दिवसांपूर्वी करोना तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरातील नागरिकांचे अहवाल सोमवारी (दि.6) सकाळी प्राप्त झाले. यामध्ये 35 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ही बाब समजताच या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या बाधित रुग्णांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलविण्याची मागणी केली. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बेड रिकामे नसून, बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर, नव्या रुग्णांना घेऊन जाण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबीचा अखेर आयुक्तांनी देखील दखल घेतली.
दाट लोकवस्तीचा परिसर
गांधीनगर ही दाट लोकवस्तीची झोपडपट्टी आहे. प्रत्येक घरात चार ते पाच व्यक्ती राहत असून, त्यापैकी 80 टक्के नागरिक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. उपचारांकरिता या नागरिकांना तत्काळ न हलविल्याने या काळात त्यांच्या राहत्या घरीच रुग्णवाहिकेची वाट पाहण्याची वेळ आली. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पीमएपीच्या बस या भागात दाखल झाल्या. करोनाची लक्षणे आढळलेल्या अत्यवस्थ रुग्णांना उपचाराकरिता वायसीएममध्ये तर लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना बालेवाडी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
चाचणी दरम्यानच आम्ही मागणी केली होती की, परिसरात असलेल्या दोन शाळांमध्ये क्वॉरंटाइनची व्यवस्था करण्यात यावी. या शाळांच्या आसपास वस्ती नसल्याने नागरिकांचा विरोध होणार नाही. परंतु पालिका प्रशासनाने आमच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. आज जेव्हा बाधित असल्याचे अहवाल आले तेव्हा त्यांना कुठे ठेवायचा असा प्रश्न पालिकेसमोर उभा राहिला आहे. गांधीनगर हा खूप दाट लोकवस्तीचा भाग आहे, येथे जास्त वेळ रुग्ण ताटकळत ठेवणे योग्य नाही.
– सचिन गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते