Video | पिंपरी-चिंचवडमधील रावेतमध्ये बेकायदेशीर आरागिरणीवर कारवाई

पुणे : पिंपरी चिंचवड भागातील मौजे रावेत येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर आरागिरणीवर वनविभागाने कारवाई केली. वनविभागाने पुण्यातील बेकायदेशीर आरागिरणीवर केलेली ही दुसरी कारवाई होती.

याबाबत वनविभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, रावेत येथे बेकायदेशीर आरागिरणी चालू असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार, वनविभागाने एक पथक नेमून या ठिकाणी कारवाई केली असता, प्रितम गौतमचंद कांकरिया यांच्या समर्थ पॅकेजिंगच्या गोडाऊन येथे आरागिरणी सुरू असल्याचे आढळले.

या कारवाईत वनविभागाने एक आरा मशिन, दोन वर्तुळाकर 15 इंची कटर मशिन जप्त करण्यात आले. तसेच याठिकाणी असलेला अवैध साठा विभागाकडून मोहोरबंद करण्यात आला. या प्रकरणात वनाधिनियम 1927 अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास चालू असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत विभागाने सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान, वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव बाबर, वनपाल महेश मेरगेवाड, वनपाल सुरेश बरले, वनरक्षक बाळासाहेब जिवडे, ज्ञानेश्‍वर ठाकरे हे सहभागी होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.