पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोकर भरतीप्रक्रियेतील सर्व 387 कर्मचार्यांना पुढील आठवड्यात रुजू करून घेण्यात येणार आहे. आयुक्तांच्या सहीने नियुक्तीपत्र दिल्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महापालिकेच्या वतीने विविध 15 पदांसाठी एकूण 387 जागांसाठी मे 2023 ला राज्यभरात ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी (पोलिस व्हेरिफिकेशन) आणि शारीरिक पात्रता तपासणी (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट) घेण्यात येत आहे.
सर्व उमेदवारांनी अर्ज नेले असून, पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून अर्ज दिले जात आहेत. आतापर्यंत 300 उमेदवारांनी पडताळणी अर्ज सादर केले आहेत.
पुढील आठवड्यात सर्व 387 उमेदवारांचे पडताळणी अर्ज प्राप्त होतील. त्यानंतर आयुक्तांची सही झाल्यानंतर त्या सर्व कर्मचार्यांना तत्काळ रुजू करून घेतले जाणार आहे. त्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.