- महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून आदेश
- सात ते आठ महिन्यांपासून बॅकफीड’ केबलचा फॉल्टच काढला नाही
- दहा मिनिटांत होणाऱ्या कामासाठी लागले सात तास
पिंपरी – रुपीनगरचा वीजपुरवठा तब्बल सात तास खंडित राहिला. सकाळच्या सत्रातच हा खोळंबा झाल्यामुळे रुपीनगर, त्रिवेणीनगर, तळवडे भागातील ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. बॅकफीड’ सप्लायने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना रुपीनगर विभागाच्या पदाधिका-यांनी केली.
सात ते आठ महिन्यांपासून बॅकफीड’ केबलचा फॉल्टच काढला नसल्यामुळे दहा मिनिटांत पूर्ववत होणारा सप्लाय दुरूस्त करायला तब्बल सात तास लागले. यामुळे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लीवर यांनी याठिकाणी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्रिवेणीनगर चौकातील विद्युत विभागाचा ओडी खराब झाल्यामुळे निगडी प्राधिकरणातील यमुनानगर भागाला विद्युत पुरवठा करणारा फिडर शनिवारी (दि. 7) सकाळी साडेआठ वाजता बंद पडला. त्यावर शिवसेना रुपीनगर विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ निगडी विभागाचे सहायक अभियंता झोडगे आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता चौधरी यांना कल्पना दिल्यानंतरही कर्मचारी हजर झाले नाही. त्यानंतर भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल गवारी यांच्याकडे तक्रार केली.
सकाळी साडेअकरा वाजता त्यांनी त्याठिकाणी येऊन पाहणी केली. त्यावेळी शिवसैनिकांनी मध्यमार्ग काढून बॅकफीड’ सप्लाय पूर्ववत करण्याची विनंती केली. मात्र सात ते आठ महिन्यांपासून बॅकफीड’ केबलचा फॉल्टच काढला नसल्यामुळे दहा मिनिटांत पूर्ववत होणारा सप्लाय दुरूस्त करायला तब्बल सात तास लागले. शनिवारी दुपारी अडीच वाजता विद्युत सप्लाय पूर्ववत करण्यात आला.
तब्बल सात तास विद्युत पुरवठा खोळंबल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या बंद राहिल्या. एवढे होऊन सुध्दा जबाबदार अधिकारी आले नाहीत. शेवटी याची पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लीवर यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी कार्यकारी अभियंता गवारी यांनी रुपीनगरला भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, शिवसैनिकांनी संबंधित निष्क्रिय अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास विद्युत विभागातील प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा शिवसेना विभागाच्या वतीने देण्यात आला. त्यावर तगलपल्लीवर यांनी रुपीनगर-तळवडे भागाला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. विद्युत पुरवठा खंडित होण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले.
या तक्रारीची तातडीने दखल घेतल्याबद्दल शिवसेना विभागाच्या वतीने तगलपल्लीवर यांचे अभार मानले. यावेळी विभाग प्रमुख नितीन बोंडे, शिवसेना शहर संघटक व सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर, शाखाप्रमुख प्रवीण पाटील, रमेश पाटोळे, नामदेव नरळे, अशोक जाधव, सुनिल शिंदे, अरुण थोपटे, अरुण ढाके, सुनील समगिर, अमित शिंदे, सहदेव चव्हाण आदी उपस्थित होते.