शिक्रापूर – करोनाचा फैलाव जसा सुरू झाला होता तेव्हापासून त्याचा फैलाव रोखण्यामध्ये पिंपळे खालसा (ता. शिरूर) गावाला यश आलेले असताना नुकताच गावामध्ये करोनाचा शिरकाव होऊन एकाच कुटुंबातील सात जणांना लागण झाली असल्याने गाव हादरले आहे.
पिंपळे खालसा येथील एक युवक सणसवाडीतील एका कंपनीत कामाला असून त्याला काही त्रास जाणवू लागला; मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याच्या वडिलांना देखील जास्त त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खबरदारी म्हणून त्यांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि पिंपळे खालसा गावामध्ये करोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले.
त्यपाठोपाठ त्यांच्या मुलाने तपासणी केली असता त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने या दोघांना शिरूर व पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, आरोग्य विभागाने या कुटुंबातील आठ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून आठ जणांपैकी पाच पॉझिटिव्ह तर तिघांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पिंपळे खालसा येथील एकाच कुटुंबातील बाधितांची संख्या सात झाली आहे.
या रुग्णांची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विभागाचे डॉ. महेश लकडे, पिंपळे खालसाच्या ग्रामविकास अधिकारी शीतल भालसिंग यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रुग्ण राहत असलेल्या परिसरात औषध फवारणी करीत निर्जंतुकीकरण केले आहे. तर बाधितांच्या संपर्कात आलेल्या इतरांची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
कोणालाही काही त्रास जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता आरोग्य विभागाकडे संपर्क करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. तर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.