सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंधामुळे रिक्षाचालक सुसाट

दुप्पट दराने प्रवासी वाहतूक : सर्वसामान्यांना बसतोय फटका


करोनाचे नियम पायदळी : पोलिसांचीही मूक सहमती

पिंपरी – गेली चार महिन्यांपासून सुरु असलेला लॉकडाउन हटवून नागरिकांना दिलासा देण्याकरिता अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील निर्बंध अद्यापही कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत, बस तिकीट दराच्या दुप्पट रक्‍कम उकाळून, तीन ते चार प्रवाशांची सर्रास वाहतुक केली जात आहे. या बेजबाबदार वर्तणुकीमुळे करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्‍यता आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे लाखो कामगार बेरोजगार झाले; तर हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांना अन्नाची भ्रांत झाली. ऑगस्ट महिना संपेपर्यंत लॉकडाऊन असले, तरीदेखील लॉकडाउन शिथील करताना सार्वजनिक वाहतुकीत महत्वाचे स्थान असलेल्या रिक्षांना चालकासह दोन प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता रिक्षाचालकांनी प्रवाशामदरम्यान प्लास्टिक पेपर गुंडाळून दोघांची प्रवास सुरक्षित केला आहे.

लॉकडाऊन काळात रिक्षा चालविण्यासदेखील मनाई होती. त्यामुळे या घटकाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील आवश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली असून, सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीला अद्यापही मनाई करण्यात आली आहे.

याशिवाय ठराविक मार्गांवर त्यामुळे या दोन्ही शहरातील नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता खासगी वाहनांचा वापर करत आहेत. तर ज्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे वाहन नाही, अशा नागरिकांकडून प्रवासाकरिता रिक्षांचा वापर केला जात आहे. मात्र, या रिक्षा चालकांकडून करोनाच्या काळातही बस तिकीटापेक्षा खूप अधिक प्रवास भाडे आकारले जात आहे. अन्य कोणतेही प्रवासाचे साधन नसल्याने, प्रवासीदेखील रिक्षाने प्रवास करत असल्याने, रिक्षा चालकांकडून त्यांची आर्थिक लूट होत आहे.

मोशी टोलनाक्‍यावर पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष
शहरात प्रवेश करणाऱ्या मोशी टोलनाक्‍यावर कायम पोलिसांचा पहारा असतो. मात्र, करोनाच्या काळात ठरवून दिलेल्या प्रवासी संख्येपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या अनेक रिक्षांची मोशी टोलनाक्‍यावरुन सर्रास ये-जा सुरु असते. मात्र, इतर वाहनचालकांना बाजुला घेत, चौकशी करणाऱ्या पोलिसांकडून या रिक्षा चालकांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.

करोनापासून रिक्षाचालक व प्रवाशांचादेखील बचाव व्हावा, याकरिता सुरक्षितेसाठी संघटनेच्या वतीने रिक्षामध्ये बसविण्यासाठी पडद्यांचे वाटप करण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिक्षाचालकांनी दोनपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करु नये. तसेच करोनाचे संकट असताना बस तिकिटापेक्षा अधिक दर घेऊ नये. मात्र, शहरातील अनलॉक प्रक्रियेदरम्यान प्रशासनाने रिक्षाचालकांचादेखील सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
-बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत.

Leave A Reply

Your email address will not be published.