जयपूर – राज्य कॉंग्रेसमधील अस्वस्थ आणि बंडखोर नेते सचिन पायलट यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग आता लवकरच सुकर होईल, असे मानले जात आहे. राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकाल कॉंग्रेससाठी एक झटका आहे. या निकालामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे राजकीय वजन कमी होण्याची शक्यता आहे. हे निकाल गेहलोत यांचे राजकीय स्पर्धक सचिन पायलट गटासाठी थोडे फायद्याचे ठरु शकतात.
प्रदेश कॉंग्रेसच्या समित्यांवर तसेच राज्यातील अन्य पदांवर समान नियुक्त्या होतील असे राजस्थान कॉंग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी आधीच सांगितले आहे. सचिन पायलट गटाची या नियुक्त्यांवर नजर आहे. ज्यांनी पायलट यांच्याबरोबर जवळीक दाखवली. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नव्या नियुक्त्यांमध्ये विचार होईल, अशी पायलट गटाला अपेक्षा आहे. अनेक वर्षांपासून जे कार्यकर्ते मेहनत करतायत, त्यांना नियुक्त्यांमध्ये वाटा दिला पाहिजे असे सचिन पायलट यांनी म्हटले आहे.
डिसेंबर किंवा पुढच्या महिन्यात राजस्थानातील महामंडळे आणि अन्य पदांवर नेमणुका होणार आहेत. त्यावेळी पायलट सर्मथकांना महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागण्याची अपेक्षा आहे. पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने कॉंग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. ग्रामीण भागात पकड असल्याचा दावा करणाऱ्या कॉंग्रेससाठी हा एक झटका आहे. त्यामुळे वयोवृद्ध गेहलोत की तरूण पायलट असा विचार पक्षश्रेष्ठींनी केल्यास पायलट यांचेच पारडे वर असल्याचे मानले जात आहे.