जयपूर: राजस्थानमधील बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यासाठी कॉंग्रेसने अजूनही आपली दारे खुली ठेवल्याचे संकेत मिळत आहेत. पायलट यांनी आपल्या परिवारात परतावे, असे आवाहन कॉंग्रेसकडून करण्यात आले.
भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याची भूमिका पायलट यांनी जाहीर केली आहे. त्याचा संदर्भ घेऊन कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी येथे पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. भाजपमध्ये जायचे नसेल तर पायलट यांनी त्या पक्षाकडून होणारा पाहुणचार थांबवावा. हरियाणा पोलिसांच्या सुरक्षेत पायलट यांचे समर्थक आमदार दोन लक्झरी हॉटेल्समध्ये मुक्कामी आहेत. पायलट यांनी त्या आमदारांना मुक्त करावे, असे सुर्जेवाला यांनी म्हटले.
भाजपची सत्ता असणाऱ्या हरियाणाच्या गुडगावमधील हॉटेल्समध्ये राजस्थानमधील आमदार राहत असल्याचे वृत्त आहे. त्याचा आधार सुर्जेवाला यांनी घेतला. पायलट यांना तरूण वयात कॉंग्रेसने महत्वाची पदे दिली. त्यांनी जयपूरच्या घरी परतून पक्षाच्या व्यासपीठावर बोलावे. या आणि परिवारात चर्चा करा. त्यातून त्यांची पक्षाविषयीची निष्ठा स्पष्ट होईल, असेही त्यांनी म्हटले.