कोलकता – पश्चिम बंगाल आणि कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने बंगाल आणि मध्य प्रदेशातून काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या तीन इसिस दहशतवाद्यांच्या चौकशीदरम्यान सुरक्षा यंत्रणांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यांच्या लॅपटॉप आणि पेन ड्राईव्हमधून देशातील अनेक दिग्गज नेत्यांचे फोटो सापडले आहेत. यापैकी काही सत्तेतील उच्चपदस्थ लोक आहेत. प्रजासत्ताक दिनापूर्वी अशी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आयएसआयएसशी संलग्न असलेल्या तीन दहशतवाद्यांची चौकशी सुरूच आहे.
मध्य प्रदेशातून अटक करण्यात आलेला दहशतवादी रकीब कुरेशीच्या पेनड्राईव्ह आणि लॅपटॉपमधून अनेक बड्या नेत्यांचे फोटो सापडले आहेत. त्यात केवळ भाजपचेच नाही तर इतर पक्षांच्या नेत्यांचे फोटो आहेत. हे सर्व नेते त्यांच्या निशाण्यावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. या नेत्यांवर हल्ल्याचा कट रचला जात होता.
रकीब कुरेशीसह हावडा येथून पकडलेले मोहम्मद सद्दाम आणि सईद अहमद यांची समोरासमोर चौकशी केली जात आहे. त्यांची छायाचित्रे का ठेवण्यात आली होती आणि त्यांचे लक्ष्य कोण होते, याचा शोध घेतला जात आहे. यासोबतच त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध एजन्सी घेत आहेत. सुरक्षा यंत्रणा दहशतवाद्यांचे पुढील प्लॅन शोधण्यात व्यस्त आहेत.