पुणे – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर रमेश बैस हे नवे राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले. मात्र अजूनही भगत सिंह कोश्यारी यांनी केलेली वादग्रस्त विधाने जनता विसरलेली नाही. याचाच प्रत्यय काल झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत पाहायला मिळाला. कोश्यारींवरून भर सभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर हात जोडल्याचे कालच्या पुण्यातील सभेत दिसून आले.
झालं असं चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोट निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला असून भाजपसह महाविकास आघाडीने प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. कसाब पेठेत रोज सभा,रॅली अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन होताना दिसत आहे. काल कसब्यामध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना एका गोष्टीसाठी प्रचंड आग्रह केला. दादांना मात्र कार्यकर्त्यांची इच्छा पुरी करणं शक्य नव्हतं म्हणून दादांनी थेट कार्यकर्त्यांसमोर हात जोडल्याचे दिसून आले.
वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला. यामुळे राज्यात ठिकठिकाणी अनेकांनी जल्लोष केला. कसब्यातील सभेदरम्यान देखील कार्यकर्त्यांनी कोश्यारी पदावरून दूर गेल्याचा आनंद साजरा करण्यासाठी एक योजना आखली होती. कार्यकर्त्यांनी अनेक काळ्या फुग्यांना कोश्यारींचा फोटो लावून हे फुगे हवेत सोडण्यासाठी सभेमध्ये आणले होते.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह स्टेजवर नाना पटोले आणि अजित पवार देखील उपस्थित होते. काळे फुगे आणि त्याला लावलेला कोश्यारींचा फोटो घेऊन कार्यकर्ता थेट मंचावर अजित पवारांकडे गेला आणि हे फुगे हवेत सोडण्याची विनंती दादांना करू लागला. कार्यकर्त्याने खूपच आग्रह केल्यानंतर अखेर दादांनी दोन्हही हात जोडले. इतक्यात पोलिसांनी मंचावर येत हे फुगे जप्त केल्याचे दिसून आले. प्रचार सभेत घडलेल्या या मिश्किल बाबीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.