नवी दिल्ली : संपूर्ण जगाला आज धडकी भरणार आहे. कारण आजपासून देशाच्या एअरो इंडिया 2023 ला सुरुवात होणार आहे. यामध्ये भारतीय सैन्याच्या हवाई दलाकडून सर्वोत्तम हवाई कसरतींचे दर्शन होणार असून त्यामुळे जगाला भारताची पुन्हा एकदा ताकद दिसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज एअरो इंडिया 2023 कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. हा एअर शो 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे.
कर्नाटकच्या बंगळुरुमधील येलहंका एअर फोर्स स्टेशनमध्ये एअरो इंडिया 2023 कार्यक्रम होणार आहे. यामध्ये भारतीय हवाई दलाची वेगवेगळी प्रात्यक्षिकं पाहायला मिळणार आहेत. हवाई दलात नव्याने सामील करण्यात आलेले तेजस लढाऊ विमान यातील मुख्य आकर्षण असणार आहे.
‘एअरो इंडिया’ कार्यक्रमामध्ये जगाला भारताची नवीन ताकद पाहायला मिळणार आहे. भारत लष्करी विमाने, हेलिकॉप्टर, संरक्षण उपकरणे आणि नवीन युगातील एव्हीओनिक्स निर्मितीसाठी एक उदयोन्मुख केंद्र म्हणून नावारुपाला येताना दिसत आहे. या दृष्टीने ‘एअरो इंडिया’ शो फार महत्त्वाचा आहे. 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान बंगळुरूमध्ये ‘एअरो इंडिया’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने याबाबत निवेदन जारी करत म्हटले आहे की, ‘एअरो इंडिया 2023’ (Aero India 2023) ची थीम “द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज” आहे. दरम्यान, एअरो इंडिया शोदरम्यान हवाई क्षेत्रातील ट्रॅफिक नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना (Advisory) जारी करण्यात आल्या आहेत. बंगळुरु पोलिसांनी वाहतुकीसंदर्भातही सूचना जारी केल्या आहेत. एअरो इंडिया 2023 मध्ये 80 हून अधिक देशांचा सहभाग दिसेल. सुमारे 30 देशांचे मंत्री, जागतिक आणि भारतीय OEM चे 65 सीईओ या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, एअरो इंडिया कार्यक्रम लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA)-तेजस, HTT-40, डॉर्नियर लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH), लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) आणि Advanced Light Helicopter (ALH) सारख्या स्वदेशी हवाई प्लॅटफॉर्मच्या निर्यातीला प्रोत्साहन देईल. या कार्यक्रमात मेक इन इंडियासोबतच देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन मिळेल. या एअर शोच्या माध्यमातून भारत हवाई क्षेत्रात आपली ताकद दाखवणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी तब्बल 731 कंपन्यांनी आपल्या शस्त्रांचं प्रदर्शन करण्यासाठी नोंदणी केली आहे. 731 कंपन्यांमध्ये 633 भारतीय आणि 98 विदेशी कंपन्यांचा समावेश आहे.