नगर – केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत नगर शहर पाणीपुरवठा योजना, शहर भुयारी गटर योजना तसेच शहर वाढीव पाणीपुरवठा योजना फेज-2 या तिन्ही प्रकल्पांना गती देवून येत्या मार्चपर्यंत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज दिले. महापौरांनी फेज-2 सह अमृत योजनेला पुन्हा मुदतवाढ दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अमृत योजनेंतर्गत नगर शहर पाणीपुरवठा योजना तसेच शहर भुयारी गटर योजनेच्या कामाची सद्यस्थितीबाबत माहिती घेण्याच्या दृष्टिने व प्रकल्पास गती देण्यासाठी वाकळे यांनी बैठक घेतली. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, उपसभापती सुवर्णाताई गेणप्पा, नगरसेवक राहुल कांबळे, उपायुक्त प्रदिप पठारे, यंत्र अभियंता परिमल निकम, पाणीपुरवठा विभाग प्रमुख एम.डी.काकडे, अभियंता गणेश गाडळकर, सदाशिव रोहोकले, आर.जी.सातपुते, मजीप्राचे उपअभियंता अजय मुळे, शोननचे अभियंता दयानंद पानसे, ड्रीम कंन्स्ट्रक्शनचे पवन भावसार, तापी एजन्सीचे रितेश आगरवाल, पार्वती अग्रोचे शंकर खोत, किशोर कानडे, राजू व्यापारी आदी उपस्थित होते.
यावेळी वाकळे यांनी शहर पाणीपुरवठ्याच्या कामाची सद्यस्थितीची माहिती घेतली. पाणीपुरवठा योजनेचे राईझिंग पाईप अंथरण्याचे काम 560 मीटरपर्यत पूर्ण करण्यात आले. त्याबाबतचे 62 टक्के काम पूर्ण करण्यात आले. दूध डेअरी ते वडगाव गुप्तापर्यंत 4 किमीचे काम पूर्ण झाले. संपवेलचे पीसीसी व फुटींगचे काम पूर्ण करण्यात आले. एमएसपाईप अंथरणेचे काम 163 मीटर पूर्ण झाले. मुळानगर येथील दोन गेटचे काम जास्त पाणी असल्यामुळे करता येत नाही. ते काम पाण्याचे उन्हाळी आवर्तन झाल्यानंतर पूर्ण करण्यात यावे.
जीवन प्राधिकरणाकडून कामाबाबत लेखी माहिती घ्यावी. जेणे करून कामास गती येईल. वसंत टेकडी येथील जीएसआर टाकीचे स्लॅबचे काम सुरू आहे. याबाबत वाकळे यांनी ज्या ठिकाणी लाईन टाकणेस अडचण नाही, अशा भागात पाईपलाईन टाकण्याच्या सुचना दिल्या. तसेच ज्या भागात अडचणी असतील, अशा ठिकाणी शेतकऱ्यांशी चर्चा करून अडचणी सोडविण्यात येतील.परंतु कामास गती देवून एक महिन्यात एक किमीचे काम होईल. याबाबत कामास गती देण्यात यावी.
जलशुद्धीकरण केंद्राचे काम फेब्रुवारीपर्यत पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या. वसंत टेकडी येथील टाकीचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या. पाईप लाईन टाकण्यासाठी शेतकऱ्यांची अडचण येत असेल तर जागेचे पंचनामे करून लाईन टाकण्यात यावी. पाटबंधारे विभागाची काही ठिकाणी अडचण असल्यास तात्काळ पत्र व्यवहार करण्यात यावा. भुयारी गटर योजनेतील ड्रेनेजपाईपचे डायमीटर बदलणे हे काम लवकरात लवकर करून पाईपलाईनचे काम सुरू करावे. पंपीग स्टेशनसाठी आवश्यक असणारी जागा येत्या आठ दिवसात ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही करावी.
नगररचना विभागाने यासाठी पुढील पुर्तता करून जागा ताब्यात द्यावी. त्याठिकाणी देखील कामास सुरूवात करण्यात यावी. शहरामध्ये आवश्यक ठिकाणी पाईपचे डायमीटर बदलणे, याबाबतचे नकाक्षे जीवन प्राधिकरणाने तयार करून संबंधित एजन्सीकडे देण्यात यावे व त्याप्रमाणे कार्यवाही सुरू करावी. फेज-2 चे एचडीपीपाईप राहिलेले अंथरण्याचे काम पूर्ण करण्यात यावे.जलदाब चाचणीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. 118 किमी राहिलेले काम 8 जानेवारीपर्यंत पूर्ण करून टेस्टींग घेण्यात यावे. पाईप अंथरणे, जोडणे, केलेली खोदाई जीवन प्राधिकरण व महापालिका अभियंत्यांनी तपासून घेवून कारवाई करावी. एचडीपीपाईप आवश्यक त्या साईजनुसार उपलब्ध करून देण्यात यावे. कामाची गती वाढविण्यासाठी टिम वाढवून काम पूर्ण करावे, नाहीतर दंड वाढविण्यात येईल, असे वाकळे यांनी सांगितले.