पुणे – विद्यापीठ अनुदान आयोगाने फक्त विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदासाठी “पीएच.डी.’ची अनिवार्यता काढून टाकली. त्यामुळे आता विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी आता नेट-सेट हीच पात्रता असेल आणि पीएच.डी. पदवी ग्राह्य नसेल, असा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र नेट-सेट नसलेले; परंतु पीएच.डी.धारकही सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र राहतील. महाविद्यालयातील प्राध्यापक पदाच्या पात्रतेत कोणताही बदल करण्यात आला नाही, हेही “यूजीसी’च्या अधिनियमातील दुरुस्तीवरून स्पष्ट होत आहे.
“यूजीसी’ने 2018 अधिनियमात दुरुस्ती करणारे नोटीस प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार जुलै 2021 नंतर विद्यापीठात नियुक्तीसाठी अनिवार्य असणारी पीएच.डी. पात्रताऐवजी आता नेट-सेटधारक सुद्धा विद्यापीठात थेट नियुक्तीसाठी अर्ज करू शकतात, हा बदल करण्यात आला होता. त्यावरून सेट आणि नेटही नाही; पण पीएच.डी. आहे, अशा उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. वरिष्ठ महाविद्यालयात यापूर्वी सहायक प्राध्यापक पदासाठी सेट-नेट अथवा पीएच.डी. ही पात्रता आहे. महाविद्यालयीन स्तरावर नियुक्तीसाठी होणारे पात्रतेत कोणताच बदल नाही. त्यामुळे पूर्वीचे निकष कायम राहतील. म्हणजेच सेट-नेट नसलेले, पण पीएच.डी. असलेले उमेदवारही प्राध्यापक होण्यासाठी पात्र असतील. नेट-सेट धारकही अर्ज करू शकतील. त्याचप्रमाणे पीएच.डी.धारकही पात्र असतील.
यूजीसीने नवीन दुरुस्ती अधिनियमात संपूर्ण कलम 3.0 रद्द केलेले नाही. तर कलम 3.0 चे उपकलम 3.10 हे रद्द केलेले आहे. त्यावरून विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात सहायक प्राध्यापक पदासाठी सेट-नेट बरोबरच पीएच.डी.धारकही पात्र राहतील. मात्र, महाविद्यालयातील प्राध्यापक पदाच्या पात्रतेत बदल नाही, असे “बेस्टा’ संघटनाचे राज्य समन्वयक प्रा. संतोषकुमार पाटील म्हणाले.
यूजीसीच्या नव्या दुरुस्ती अधिनियमानुसार पीएच.डी.ऐवजी आता विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी सेट-नेट धारकही अर्ज करू शकतील. त्याचप्रमाणे पीएच.डी. पदवीही पात्र राहतील. यावरून आता सेट-नेटशिवाय पर्याय नाही, हेच अधोरेखित होत आहे, असे टी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले.