पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठीची पीएच.डी. पात्रता परीक्षा (पेट) लांबणीवर पडली आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 21 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यापीठाकडून 2019 मध्ये “पेट’ घेण्यात आली होती. त्यामुळे विद्यापीठाकडून आता जवळपास दोन वर्षांनी पीएच.डी.ची प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी विद्यापीठाकडून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 8 ऑगस्टची, तर संशोधन केंद्र आणि रिक्त जागांची माहिती अद्ययावत करण्यासाठी 30 जुलैची मुदत देण्यात आली होती. आता मार्गदर्शकांना संशोधन केंद्र आणि रिक्त जागांची माहिती 14 ऑगस्टपर्यंत देता येणार आहे. परीक्षेचे अर्ज भरणे आणि माहिती अद्ययावत करण्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
राज्यातील पूरपरिस्थिती, दरड कोसळण्याच्या प्रकारामुळे काही उमेदवारांना अर्ज भरता आला नव्हता. त्यामुळे विद्यापीठाने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, 22 ऑगस्टला होणारी परीक्षा दहा ते पंधरा दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.