पुणे – “पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 2014 च्या तुलनेत 316 टक्के, तर डीझेलमध्ये 840 टक्के वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेलमध्ये होणारी वाढ ही आंतरारष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या दरामुळे होत नसून केंद्र सरकार सातत्याने करामध्ये वाढ करत आहे. त्यामुळे पेट्रोल, डीझेलचे दर वाढत आहेत,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केली. देशाची अर्थव्यवस्था मंदावलेली आहे.
सरकारचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल, डीझेलमध्ये वाढ केली आहे. तसेच सरकारी कंपन्या, बॅंका विक्री करून तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. शिवाजीनगर येथील कॉंग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल, गोपाळ तिवारी आदी यावेळी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले की, पेट्रोल, डीझेलच्या दरामध्ये मागील सात महिन्यांत 66 वेळा वाढ करण्यात आली आहे.
पेट्रोल, डीझेलच्या दरामध्ये वाढ करून केंद्र सरकार जनतेची लूट करत आहे. पेट्रोलमध्ये 23 टक्के, डीझेलमध्ये 28 टक्के आणि गॅसमध्ये 47 टक्के इतकी वाढ झाली आहे. केंद्र सरकार उत्पादन कर व सीमा शुल्कामध्ये वाढ केल्याने इंधनाचे दर वाढत आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढीमुळे महागाईदेखील वाढली आहे, असे चव्हाण म्हणाले.