नागपूर : नागपुरात पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर या तरुणाचा मृत्यू झाल्या प्रकरणी पीएसआयसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मनोज ठवकर मृत्यू प्रकरणी आरोपी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशन हद्दीत सात जुलैच्या रात्री ही घटना घडली होती. आधी तिघा पोलिसांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. मात्र आता पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मास्क न घातल्यामुळे तीन पोलिसांनी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा आरोप आहे. मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून कारवाईची मागणी केली होती.
35 वर्षीय मनोज ठवकर हा दिव्यांग होता. मेकॅनिक म्हणून तो नागपुरात काम करत होता. नागपूर शहरातील पारडी चौक हनुमान मंदिर परिसरात सात जुलैच्या रात्री पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. रात्री साडेआठ-नऊ वाजताच्या सुमारास मनोज या मार्गाने घरी चालला होता. मनोजची दुचाकीही थांबवण्यात आली, मात्र वेळीच ब्रेक न लागल्याने त्याची दुचाकी पोलीस वाहनावर धडकली.
मनोजने मुद्दाम धडक मारल्याचा पोलिसांचा समज झाला, असा दावा केला जातो. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे याच्यासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्येही नेण्यात आले. मात्र शुद्ध हरपलेल्या मनोज ठवकरला नागपुरातील भवानी मल्टिस्पेशालिटी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्याआधीच मृत घोषित करण्यात आलं होतं.