पिंपरी – राज्यातील जनतेच्या हिताची कोणतीच योजना आखण्यात आणि अंमलात आणण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असून, पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्याचा गवगवा करून फसवणुकीचा नवा पायंडा पाडणारे ठाकरे सरकार कराद्वारे लूट करणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे सरकार ठरले आहे, अशी टीका भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली.
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात असल्याने पेट्रोल डिझेलवरील करामध्ये 50 टक्के कपात करून दारूचा न्याय पेट्रोल डिझेललाही लावलाच पाहिजे, या मागणीही त्यांनी केली आहे. आमदार लांडगे यांनी बाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जनतेच्या खिशातून हजारो कोटींची लूट केल्यानंतर आता पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये ( व्हॅट ) अनुक्रमे 2.08 रुपये व 1.44 रुपय कपातीचा पोकळ गाजावाजा करून ठाकरे सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. केंद्र सरकारचा इंधनावरील कर केवळ 19 रुपये असताना ठाकरे सरकार मात्र 30 रुपये कर आकारून शासकीय तिजोरी भरत आहे.
महाविकास आघाडीचा दुटप्पीपणा
महाराष्ट्रात पेट्रोलवर लिटरमागे 32.55 रुपये तर डिझेलवर लिटरमागे 22.37 रुपये एवढा कर राज्य सरकार आकारते. केंद्र सरकारने कर कपात करून राज्याचा कर कमी करण्याचे आवाहन केल्यानंतरही ठाकरे सरकारने कर कमी केले नाहीत, उलट अनावश्यक वाद घालून राजकारण सुरू ठेवले. एकीकडे महागाईच्या नावाने सत्ताधाऱ्यांनीच निदर्शने करायची आणि दुसरीकरे कर कपात न करता जनतेची लूट सुरूच ठेवायची असा दुटप्पी डाव महाविकास आघाडी खेळत आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.