पिंक चायना, पिंक तैवान, सरदार लखनौ 49, व्हिएनार जातीचे फळ दाखल
पुणे – पेरूचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. यंदा पहिल्यांदाच शिर्डी, राहातामधून “पिंक चायना’ अर्थात “पिंक तैवान’ या जातीच्या बाह्य बाजूने रंगाने हिरवा आणि आतील बाजूस गुलाबी असलेल्या पेरूची आवक मार्केट यार्डातील फळ विभागात होत आहे. याबरोबरच “सरदार लखनौ 49′ तसेच “व्हिएनार’ या जातीच्या पेरूंनादेखील मागणी आहे.
यंदा पाऊस लांबल्याने पेरूचे उत्पादन उशिरा हाती आले. त्यामुळे हंगाम दोन महिने उशिरा सुरू झाला. येत्या फेब्रुवारीपर्यंत तसे सुरू राहील. “गावरान पेरू’ म्हणून ओळखला जाणाऱ्या “सरदार लखनौ 49′ आणि “पिंक तैवान’ जातीच्या पेरूची नगर जिल्ह्यातील शिर्डी, राहाता येथून आवक झाली. सरदार पेरू हा मध्यम आकाराचा, 200 ते 500 ग्रॅम वजनाचा असून, यास घाऊक बाजारात प्रतिकिलो 20 ते 25 रुपये भाव मिळाला.
“तैवान’ जातीच्या पेरूचीही शिर्डी, राहाता भागातील 4 शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले आहे. त्याची मार्केटयार्डात आवक होत आहे. 14 ते 15 किलोच्या पॅकिंगमध्ये या पेरूची आवक होते. हा आतील बाजूस गुलाबी रंगाचा असल्याने त्याला पसंती अधिक असते. 400 ते 700 ग्रॅम वजनाचे एक फळ असते. ते जाळीमध्ये पॅकिंग करून बाजारात येते. 40 ते 60 रुपये किलो भावाने त्याची विक्री होत आहे. सध्या त्याची कमी प्रमाणात आवक होत आहे,’ अशी माहिती विक्रेते संतोष ओसवाल यांनी दिली.
पुणे जिल्ह्याच्या काही भागांतून “व्हिएनार’ जातीच्या पेरूची आवक होते. त्यालासुद्धा जाळी लावली जाते. ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी ही जाळी लावण्यात येते. आकाराने मोठा असलेल्या एका पेरूचे वजन हे 400 ग्रॅम ते एक किलोपर्यंत असते. एका किलोला 30 ते 70 रुपये भाव मिळाला. सर्व पेरूची मिळून 8 ते 10 टन एवढी आवक झाली.
– संतोष ओसवाल, पेरुचे विक्रेते