ओल्या कचऱ्यातून तब्बल 186 टन “सीबीजी’ची निर्मिती

बाणेर येथे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा प्रकल्प : कचऱ्याचे वर्गीकरण करणे ठरतेय फायद्याचे


दररोज जिरवला जातोय 125 टन ओला कचरा : 137 टन गॅसची इंडियन ऑइल कंपनीला विक्री

पुणे – कचरा वर्गीकरणानंतर ओल्या कचऱ्यावर महापालिकेच्या बाणेर येथील नोबेल एक्‍सचेंज या प्रक्रिया प्रकल्पात गेल्या 6 महिन्यांत तब्बल 186 टन “सीएनजी’ची निर्मिती झाली आहे. यातील 137 टन कॉम्प्रेस्‌ड बायोगॅस (सीबीजी)ची इंडियन ऑइल कंपनीला विक्री करण्यात आली असून कंपनीकडून 18 हजार वाहनांसाठी तो वापरल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी दिली. हा प्रकल्प दीड वर्ष बंद होता. महापालिकेने पुढाकार घेत तो एप्रिल 2019 मध्ये पुन्हा सुरू केला असून प्रकल्पात दिवसाला 125 टन ओला कचरा जिरविण्यात येत असल्याचे मोळक यांनी स्पष्ट केले.

पालिकेने नागरिकांना ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण सक्‍तीचे केले आहे. या कचऱ्यावर वेगवेगळ्या 125 प्रकल्पांमध्ये प्रक्रिया होते. तर पालिकेने शहरभर 25 हून अधिक ओल्या कचऱ्यावरील गॅस निर्मितीचे प्रकल्पही उभारले आहेत. पालिकेने 3 ते 4 वर्षांपूर्वी बाणेर येथे हा प्रकल्प उभारला होता. त्यात तयार होणारा गॅस पीएमपीसाठी वापरण्यात येणार होता. मात्र, प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेला ओला कचरा न मिळणे तसेच आलेल्या कचऱ्यात वाळू, खडी असे घटक असल्याने प्रकल्प वारंवार बंद पडत होता. पालिकेने शहरातील कचऱ्याची स्थिती लक्षात घेऊन हा प्रकल्प पुन्हा सुरू केला.

त्यात प्रतिदिन 5 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात करत आता 125 टन ओला कचऱ्यापासून गॅस निर्मिती होते, असे ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले.

इंडियन ऑइल, महिंद्राकडून खरेदी

प्रक्रिया प्रकल्प पालिकेने सुरू केल्यानंतर गेल्या 6 महिन्यांत तब्बल साडेसहा हजार मेट्रिक टन कचरा जिरवत सुमारे 186 टन “सीबीजी’ची निर्मिती करण्यात आली होती. यातील 137 टन “सीबीजी’ इंडियन ऑइल कंपनीला विकण्यात आला असून उर्वरित 49 टन महिंद्रा कंपनीला दिल्याचे ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी कचरा वर्गीकरण केल्यास त्याचा चांगला फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)