टक्का घटला; फायदा कुणाला?

बापट, की जोशी? : पुणेकारांचा कौल मतपेटीत बंद

पुणे – “पुण्यातील लोकसभेची जागा मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्‍याने जिंकणार,’ असा दावा भाजपने केला आहे. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत भाजपच्या बालेकिल्ल्यात घटलेली मतदानाची टक्केवारी आणि दुपारनंतर मतदानासाठी बाहेर पडलेला कॉंग्रेसचा परंपरागत मतदार यामुळे पुण्यातील मतदानाचा टक्का कायम राहिला आहे. मात्र, या टक्‍क्‍याचा फायदा नेमका कोणाला होणार हे निवडणुकीच्या निकालावरच ठरणार आहे. यावर राजकीय चर्चाही रंगल्या असून 23 मे रोजीच आता हे कोडे सुटणार आहे.

भाजपने यावेळी विद्यमान खासदारांना डच्चू देत पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. कॉंग्रेस उमेदवाराची घोषणा होण्याआधी जवळपास आठ दिवस आधी भाजपने उमेदवार जाहीर केला. मात्र, त्याच वेळी निवडणूक अर्ज भरण्यास दोन दिवस शिल्लक असतानाही कॉंग्रेसने उमेदवारच जाहीर केला नव्हता. तर त्यापूर्वी एका आठवड्यात कॉंग्रेसकडून उमेदवार जाहीर नसतानाही दोन उमेदवारांच्या नावांची चर्चा करत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला होता. त्यामुळे भाजपकडूनही निवडणूक गांभीर्याने पाहिली जात होती.

मात्र, त्याच वेळी कॉंगकडून ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे भाजपने ही निवडणूक आता केवळ मताधिक्‍य मोजण्याची असल्याचा दावा करण्यास सुरूवात केली होती. तर हे मताधिक्‍यही राज्यात सर्वाधिक असेल, तर 2014 मधे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना मिळालेल्या सव्वा तीन लाखांपेक्षा निश्‍चितच अधिक असाही दावा काही बापट निष्ठावानांकडून करण्यात येत होता. तसेच भाजपच्या संघटनात्मक प्रचार यंत्रणेमुळे हे सहज शक्‍य असल्याचेही काही जणांचे म्हणणे होते. याच “कॉन्फिडन्स’मुळे भाजपकडून प्रचारात केंद्रातील आणि तुलनेने राज्यातील मोठे नेते उतरविण्यात आले नाहीत.

सन 2014 मध्ये पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेत पुणेकरांना कारभारी बदलाचे आवाहन केले होते. तर या वेळी पुण्यात मुक्कामी असूनही सभा घेतली नाही. तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच सभा झाल्या. तसेच चित्र कॉंग्रेसचेही होते. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी पुण्यात मुक्कामी असून, त्यांनीही सभा घेतली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून निवडणूक गांभीर्याने घेतली जात नसल्याचे चित्र होते. त्यातच, जसजसा मतदानाचा दिवस जवळ येत असतानाच; भाजपच्या सहयोगी पक्ष तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनच भाजपचे मताधिक्‍य मागील निवडणुकीपेक्षा घटून बापट यांना एक ते दीड लाखांचे मताधिक्‍य मिळेल, असे खासगीत बोलताना सांगितले जात आहे.

असा घसरला आकडा
प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी अशीच काही स्थिती दिसून आली. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार असले, तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत या लोकसभा निवडणुकीत प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कसबा मतदारसंघात 7 टक्के, कोथरूड मतदारसंघात 8 टक्के, पर्वती मतदारसंघात 8 टक्के, शिवाजीनगर मतदारसंघात 7 टक्के मतदान कमी झाले आहे. त्याच वेळी वडगाव शेरी आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघात मागील निवडणुकी एवढेच मतदान झाले आहे. ही आकडेवारी अंतिम नसली तरी, भाजपसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

आता डोळे निवडणूक निकालाकडे
शहरातील सर्वच मतदारसंघात मतदान सुरू झाल्यापासून दुपारी एकपर्यंत गर्दी होती. नंतर ही गर्दी ओसरली गेली. त्याच वेळी शिवाजीनगर, कॅन्टोन्मेटच्या झोपडपट्ट्यांचा भाग, कोथरूडमधील झोपडपट्टी, हडपसरचा काही भाग, पर्वतीचा काही भागात सायंकाळी चार नंतर मतदारांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. तसेच हा मतदार कॉंग्रेसचा पारंपरिक मतदार म्हणून ओळखता जातो. शहरातून मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण अत्यंत नगण्य होते. मागील निवडणुकीत मतदार यादीत नाव नसलेले सर्वाधिक मतदार हे भाजपचे असल्याचे सांगण्यात येत होते. ही बाब लक्षात घेता, कॉंग्रेसलाही यावेळी शहरात चांगले मतदान झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीचा फायदा नेमका कुणाला होणार, हे निवडणूक निकालच ठरविणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.