ग्रामपंचायतींबाबत लोकप्रतिनिधींचा दावा खोटा – माजी मंत्री प्रा. राम शिंदे

जामखेड – ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार 80 टक्के ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत, असे सांगतात. हा त्यांचा दावा डोळ्यांत धूळफेक करणार आहे. तसेच नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी भाजप सज्ज असून, विधानसभेचा वचपा नगरपरिषद निवडणुकीत काढल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार रोहित पवार यांना त्यांचे नाव न घेता माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिला.

ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या आनुषंगाने माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी चौंडी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी शिंदे यांनी तालुक्यातील कोणत्या व किती ग्रामपंचायती कोणाच्या ताब्यात आहेत, याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर, उपसभापती रवींद्र सुरवसे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे, सरपंच काकासाहेब धांडे, तालुकाध्यक्ष अजय काशिद, नगरसेवक सोमनाथ राळेभात, युवा मोर्चाचे अध्यक्ष शरद कार्ले, पांडुरंग उबाळे, संजय कार्ले, प्रवीण चोरडिया, सरचिटणीस लहू शिंदे, डॉ. अल्ताफ शेख, अंकुश शिंदे, पोपट राळेभात, शरद हजारे, शाहरूख तांबोळी, नंदकुमार सोशल मीडिया प्रमुख उद्धव हुलगुंडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, नुकत्याच 39 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या मध्ये 417 सदस्य निवडून आले आहेत. यातील 203 सदस्य हे भाजपचे आहेत. 23 ग्रामपंचायती या भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र आमदार रोहित पवार हे 80 टक्के ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत, असे सांगतात. मात्र आमदारांचा हा दावा डोळ्यांत धूळफेक करणारा आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात आमदार हे विकासाला मत द्या, असे सांगतात. मात्र विकास कोठे आहे, तो दाखवा, असा टोला देखील शिंदे यांनी लावला. सध्या तालुक्यात विरोधकांकडून धमक्या देणे, उचलून घेऊन जाणे, पळवापळवी करणे, असे प्रकार सुरू आहेत. मात्र अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाहीत. मी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उभा राहणार नाही. तसेच जवळ येवू ठेपलेल्या जामखेड नगरपरिषद निवडणुकीत योग्य ते उमेदवार देऊन निवडून आणणार आहेत. नगरपरिषद भाजपच्या ताब्यात घेऊन विधानसभेचा वचपा काढणार, असेही शिंदे म्हणाले.

माजी मंत्री राम शिंदे मतदारसंघात सक्रिय
विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले असल्याचे सांगितले होते. मात्र आता ते पुन्हा जोमाने कर्जत-जामखेड मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. पुन्हा कार्यकर्ते, नागरिकांशी त्यांनी संपर्क वाढविला आहे. तसेच आगामी जामखेड नगरपरिषद व कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभी करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.