अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धा : पुण्याची पृथा विजेती

पुणे – पुण्याची अव्वल टेबल टेनिसपटू पृथा वर्टीकर हिने राज्य अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत 15 वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवले. या विजेतेपदासह तिने विजेतेपदांची हॅट्ट्रिक साकार केली.
मुंबईत झालेल्या 82 व्या राज्य अजिंक्‍यपद स्पर्धेत तिने अनन्या चांदेला हिचा 8-11, 15-13, 10-12, 11-5, 15-13, 10-12, 11-6 असा पराभव करून हा विक्रम साकार केला.

2016 साली 12 वर्षांखालील गटात पहिले राज्य विजेतेपद मिळविले होते. तिने 2018 साली 15 वर्षांखालील गटात पहिले विजेतेपद मिळविले. नंतर तिने 2018 मध्येही ही कामगिरी केली आणि आता सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली.

पृथाने गेल्यावर्षी सातत्यपूर्ण कामगिरी करताना 15 वर्षांखालील गटात राष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते. राष्ट्रीय मानांकनात ती अव्वलही आली होती. आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा तिचा मार्ग मोकळा झाला होता. पण, करोनामुळे तिच्याही स्पर्धेतील सहभागांवर तसेच सरावावरही बंधने आली होती.
अंतिम लढतीत या वेळी तिला अनन्याचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला.

पहिली गेम गमावल्यावर तिने दुसरी गेम जिंकून बरोबरी साधली. पण, पुन्हा तिसरी गेम तिने गमावली. चौथ्या गेमला पृथाने अनन्याला संधीच दिली नाही. पाचव्या गेमलाही अनन्याचा प्रतिकार मोडत तिने गेम जिंकली. तरी, सहाव्या गेमला अनन्याने बाजी मारून चुरस वाढवली. अखेरच्या निर्णायक गेमला मात्र पृथाने जोरदार खेळ करत अनन्याला पराभूत केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.